
लेखन, अभिनय, दिग्दर्शन, सिने-नाट्यनिर्मिती, सूत्रसंचालन आदी क्षेत्रांवर आपली अनोखी छाप सोडल्यानंतर आता महेश मांजरेकर यांनी डिजिटल जगात पाऊल ठेवलंय. ‘वॅको सॅनिटी’ हे चॅनल म्हणजे मनोरंजनासह विचारांची देवाणघेवाण, हास्याचं उधाण आणि वैचारिक चर्चांचे व्यासपीठही आहे. पॉडकास्ट, चर्चासत्र, वैचारिक आदानप्रदान आणि विनोदी प्रहसनांचा समावेश या चॅनलमध्ये असणार आहे, असं मांजरेकर सांगतात. त्यांनी नेहमीच आपल्या कामातून प्रेक्षकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे आणि ‘वॅको सॅनिटी’द्वारे ते हा संवाद आणखी सखोलपणे साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हणाले. सर्वसामान्य प्रेक्षकांना, नवोदित कलाकार, लेखकांनादेखील या ‘वॅको सॅनिटी’मध्ये सहभागी होता येणार आहे.चॅनलच्या उद्घाटनाबरोबरच, ‘वास्तव में ट्रुथ’ हा पॉडकास्ट शो उद्यापासून सुरू होणार आहे. कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, व्यवसाय आदी क्षेत्रातील मान्यवर या व्यासपीठावर असणार आहेत. या पॉडकास्टमध्ये वास्तव आणि सत्याला प्रकाशझोतात आणलं जाईल. ‘सत्य कधी कधी कटू असतं; पण त्याचा सामना करणं आवश्यक आहे’, असं मांजरेकर म्हणाले.