
पाटण प्रतिनिधी
पाटण वनपरिक्षेत्रातील घेरादातेगड (ता. पाटण, जि. सातारा) येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावताना आनंदा गंगाराम बोडके (रा. जाईचीवाडी, ता. पाटण) याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 नुसार संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.
सदर इसम जंगलात विविध ठिकाणी वणवा लावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक निखिल कदम,रोहित लोहार,मेघराज नवले,वनपाल यशवंत सावर्डेकर आणि पत्रकार लक्ष्मण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीस जागेवर पकडले आणि ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच वणवे आटोक्यात आणले. त्यामुळे मोठ्या वनक्षेत्राचे नुकसान टळले.
तथापि, या वणव्यात सुमारे ४ हेक्टर क्षेत्रातील रोपवन जळाले असून, त्यात साग रोपे, गवत, पालापाचोळा, सुकलेली झाडे, तसेच जिवंत झाडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबतच अनेक पक्षांची घरटी, अंडी, पिल्ले आणि सरपटणारे वन्यप्राणीही जळून मृत्युमुखी पडले.
ही कारवाई उपवनसंरक्षक आदिती भारदवाज, सहा. वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्पा) महेश झांजूर्णे आणि वन क्षेत्रपाल (प्रा.) राजेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वन विभागाच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.