
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
गेल्या वर्षी निकाल २० मे नंतर लागला होता. पण यंदा बारावीचा निकाल १० मेच्या आधी लागेल, तर दहावीचा निकाल १५ मेच्या आधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षेतील तब्बल २१ लाख विद्यार्थ्यांचा निकाल डिजिलॉकर अॅपमध्ये उपलब्ध केला जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
राज्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. बोर्डाकडून यंदा निकालाची डेडलाईन पाळण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झालेय. त्यामुळे वेळेत निकाल लागू शकतो.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल यंदा वेळेआधी जाहीर करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. निकाल लवकर लागण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा १० ते १५ दिवल लवकर घेण्यात आल्या आहेत. दरवर्षीपेक्षा आधीच परीक्षा घेण्यात आल्या आहत, त्यामुळे निकालही लवकर लागण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागू शकतो.
शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसर्वांच्या सहकार्याने दहावी-बारावीच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या. किरकोळ घटना वगळता यंदा कॉपी करण्याच्या घटना कमी झाल्या. पेपर तपासणारे शिक्षक आणि मॉडरेटर यांनी दिलेल्या वेळेत त्यांचे काम पूर्ण केलेय. त्यामुळे राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच दहावी-बारावीचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर करण्याचे जे आश्वासन दिले होते, त्यानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
यावर्षी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार घातला नाही. त्यामुळे पेपर तपासणी वेळेत पूर्ण झाली. त्यामुळे बोर्डाला निकालाची जय्यत तयारी करता आली. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, जिथे ८७ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. यापैकी ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांचे आयडी मंडळाकडे उपलब्ध आहेत.