
कोल्हापूर प्रतिनिधी
जोतिबा चैत्र यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यासह विविध राज्यांतून भाविक दाखल होत आहेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
यात्रेवर ड्रोनने नजर ठेवली जाणार असून, गर्दीवरील नियंत्रण व अनुचित प्रकार टाळण्यासाठी ११६ सीसीटीव्ही कार्यरत करण्यात आले आहेत.
१३० अधिकारी १४०० पोलिस कर्मचारी, १२०० होमगार्डसोबतच जलदकृती दल, निर्भया पथकेही तैनात करण्यात आल्याची माहिती शाहूवाडीचे उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी दिली. मुख्य यात्रेच्या दोन दिवस आधीच जोतिबा डोंगर गर्दीने फुलून गेला आहे. प्रतिवर्षी भाविकांची संख्या वाढत असून, गर्दीवरील नियंत्रणासाठी प्रशासन कार्यरत आहे. उन्हाचा कडाका वाढला असल्याने भाविकांच्या आरोग्याची काळजीही घ्यावी लागणार आहे.
दहा लाखांवर भाविक येण्याचा अंदाज
पार्किंग व्यवस्थेसह वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मानाच्या सासनकाठ्या व बैलगाड्यांचा ताफा सोहळ्यासाठी दाखल झाला आहे. त्यांची व्यवस्था असणाऱ्या मुख्य पार्किंग व सेंट्रल प्लाझा या दोन्ही ठिकाणांची पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पाहणी केली. दर्शन रांगेत चेंगराचेंगरी होऊ नये, याचे नियोजन जाणून घेत त्यांनी सूचना केल्या.
गर्दी नियंत्रणासाठी ११६ सीसीटीव्ही, चार ड्रोनची व्यवस्था करण्यात आली आहे. सांगली, सातारा, पुणे ग्रामीण येथून ५० अधिकारी, ३०० पोलिस अंमलदार असा अतिरिक्त फौजफाटाही मागविण्यात आला आहे. सुमारे २५ हजार वाहने पार्क करता येतील, अशी प्रशस्त व्यवस्थाही भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
‘दर्शन रांगेची शिस्त पाळण्यासाठी भाविकांनी दक्षिण दरवाजातून मंदिर आवारात प्रवेश करावा. दर्शनानंतर उत्तर दरवाजातून बाहेर पडावे. केमिकलयुक्त गुलालाचा वापर टाळल्यास कोणालाही हानी होणार नाही. तसेच खोबऱ्याची उधळण करताना बारीक तुकडे वापरल्यास दुखापतीही टाळता येतील. वाहनतळांच्या ठिकाणी आपली वाहने उभी करून प्रशासनाने पुरविलेल्या बसचा वापर करावा.
– आप्पासाहेब पवार, पोलिस उपअधीक्षक, शाहूवाडी
मदतीसाठी संपर्क
पोलिस नियंत्रण कक्ष ०२३१ २६६२३३३
पन्हाळा पोलिस ठाणे ०२३२८ २३५०२४
कोडोली पोलिस ठाणे ०२३२८ २२४१४०
जोतिबा डोंगर पोलिस चौकी ०२३२८ २३९०४१
रुग्णवाहिका सेवा १०८
असा असेल बंदोबस्त
पोलिस अधीक्षक १
अपर अधीक्षक २
पोलिस उपअधीक्षक ८
पोलिस निरीक्षक ३२
सह.पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक ८८
वाहतूक पोलिस ८०
पोलिस शिपाई १११०
होमगार्ड १२००
राज्य राखीव
पोलिस दल १ तुकडी
(याशिवाय डॉग स्कॉड पथक, क्रेन व्हॅन, व्हाइट आर्मी)