
पालघर प्रतिनिधी
विरारमध्ये काल एक धक्कादायक घटना उघडकीस आली. विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका ओसाड जागेवर एका सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं आढळलं. स्थानिक मुलांनी ही सुटकेस उघडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विरारमधील या धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येचा तपास मांडवी पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष ३चं पथक तपास करत होतं. या हत्येचा अवघ्या २४ तासांत आत हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश बरवराज हिप्परगी (वय ४९) असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. तर उत्पला हरीश हिप्परगी (वय ५१) असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. ही महिला पश्चिम बंगालची रहिवासी असून आरोपी पती हा कर्नाटकचा आहे. एका हॉटेलमध्ये काम करत असताना या दोघांची ओळख झाली. १२ वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मयत महिलेचा हा दुसरा पती असून या दोघांना एक मुलगा आहे.
हे दोघे प्रेमविवाहानंतर नालासोपारा पूर्वमधील रहेमत नगर येथे रुम भाड्याने घेऊन राहत होते.लग्नानंतर या दोघांमध्ये कौटुंबिक वादातून वारंवार वादविवाद होत होते. १३ मार्च रोजी होळीच्या दिवशी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याजवळ सडलेल्या अवस्थेत एका प्रवासी बॅगेत महिलेचं मुंडकं सापडलं होतं. दरम्यान, एका ज्वेलरी शॉपच्या पाकिटामुळे या हत्येचा उलगडा झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.