
मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पश्चिम येथील एका हिरे व्यापाऱ्याच्या सहाव्या मजल्यावरील ऑफिसमध्ये एका चोरट्याने घुसून तब्बल १.९ कोटी रुपयांचे २४ हिऱ्यांनी जडवलेले दागिने लंपास केले. सोमवारी ऑफिसमधील कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर आले.
त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. ऑफिसच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या पाच कंटेनरमधील मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे आढळले. यामुळे ऑफिसमध्ये खळबळ उडाली.
चोराने टर्नर हायट्स या इमारतीत चोरी केली. तो पायऱ्या चढून सहाव्या मजल्यावर पोहोचला. त्यानंतर, बंद खिडकी तोडून आणि पाइपलाइनच्या सहाय्याने ऑफिसमध्ये प्रवेश केला. चोर आत उडी मारताना परिसरातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर त्याने त्वरित रेकॉर्डिंग सिस्टम बंद केली.
या प्रकरणात ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या संपूर्ण घटनेत ऑफिसमधील एखादी व्यक्ती सहभागी असू शकते, कारण त्या चोरट्याला ऑफिसमधील अंतर्गत माहिती असणे सहज शक्य नाही. तसेच, चोरट्याने चावीचा वापर करून लॉकर उघडला आणि त्यातील मौल्यवान दागिने लंपास केले. त्यामुळे पोलिसांनी आतल्या व्यक्तीच्या सहभागाची शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांनी दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे आणि चोरट्याचा शोध घेतला जात आहे. ही चोरी अत्यंत नियोजनबद्धरीत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.