
पनवेल- तळोजा कारागृहात एका शिपायांच्या जेवणाच्या डब्यात अमली पदार्थ एमडीएमए आढळून आल्याचे वृत्त समोर आले आहे.१०लाख ८हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ असल्याची माहिती आहे
या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अनिल असाराम जाधव (वय.३८, रा.बांद्रा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
हा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त
• ४० ग्राम वजनाचा गांजा :- ४० हजार
• २३.८७ वजनाचा चरस :- ८ लाख ६८ हजार
• २.३९ ग्राम वजनाचे एमडीएमए :- १ लाख
• गांजा ओढण्यासाठी पाच पट्ट्या
जयवंत जाधव (वय ३८) हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात कारागृहातील हवालदार म्हणून कार्यरत आहेत. यावेळी नेहमीप्रमाणे रात्र पाळीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद तसेच तपासणी करून त्यांना सोडण्याचे काम जयवंत जाधव हे करत होते.
बुधवारी (दि.९) कारागृहामध्ये रात्र पाळी कर्तव्याकरिता आरोपी अनिल असाराम जाधव (वय.३८, रा.बांद्रा) हा आला असताना जयवंत जाधव यांचे नाव नोंदणी करणे सुरू होते.
यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जेवणाच्या डब्याच्या पिशवीवर लव्ह फूड हेट वेस्ट असे नाव असलेल्या पिशवी मध्ये दोन प्लस्टिकचे डब्बे तसेच एक पारदर्शक जेवणाचा डब्बा, तसेच अन्य दोन डब्बे दिसून येत होते.
या डब्याची तपासणी केली असता डब्यात संशयित वस्तू जयवंत जाधव यांना आढळून आल्या, त्याची अधिक अंग झडती घेतली असता, त्या डब्यात ४० ग्राम वजनाचा गांजा, २३.८७ वजनाचा चरस, २.३९ ग्राम वजनाचे पांढरे पूर्ण तसेच अर्धवट एमडीएमए तसेच गाज्या ओढण्यासाठी पाच पट्या या अंगझडतीत आढळून आले आहे.
या सगळ्याची किंमत जवळपास १० लाख ८ हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले आहे. हे सर्व पदार्थ कारागृहातील न्यायबंदी यांना सेवन करण्याकरिता पुरविण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात ठेवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अनिल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.