मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याऐवजी दादर मेट्रो स्थानकाला हे नाव देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या नामकरणाबाबत निर्माण झालेला संभ्रम काही प्रमाणात दूर झाला असला, तरी या निर्णयावरून राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे.
दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा व वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
सविस्तर वृत्त -… pic.twitter.com/B6cvJeaws3
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 19, 2026
दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यास राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार विधिमंडळ समितीशी संबंधित आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया आगामी अधिवेशनात पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मात्र, दादरच्या नामकरणाचा विषय पुढे येताच शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत आधीच विविध मुद्द्यांवरून मराठी आणि इतर भाषिक समाजांमध्ये वाद निर्माण झालेले असताना आता दादरच्या नामकरणाचा मुद्दा पुढे करून मराठी माणसांमध्येच संघर्ष घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
भाजपला मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आहे!
शिशिर शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या भूमिकेवर सडकून टीका केली. कबुतरखाने, छठपूजा आणि मराठी विरुद्ध इतर भाषिक अशा मुद्द्यांवरून मुंबईत यापूर्वी वाद निर्माण झाले. आता दादरच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित करून मराठी माणसांमध्येच फूट पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठी माणसांनी आपापसांत संघर्ष करावा, त्यातून मराठी समाजाची राजकीय ताकद कमकुवत व्हावी आणि त्याचा फायदा भाजपने घ्यावा, अशी राजकीय खेळी सुरू असल्याचा दावा शिंदे यांनी केला.
दादरचे नामकरण करण्याचा विषय पुढे आणण्याऐवजी भाजपला खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदर असेल, तर इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेची आठवण
दादरच्या नामकरणावरून शिशिर शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचीही आठवण करून दिली. दादरची ऐतिहासिक ओळख आणि मराठी माणसाच्या अस्मितेशी संबंधित असलेल्या या विषयावर राजकारण करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुंबईतील मराठी माणसाची ताकद कमी करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. दादरच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून मराठी समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महापरिनिर्वाण दिनासाठी १५ लाख अनुयायांची शक्यता
दरम्यान, ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरातील तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
यंदा ५ आणि ६ डिसेंबर रोजी सुमारे १५ लाख अनुयायी मुंबईत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
एकीकडे बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईत येण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे दादरच्या नामकरणावरून महायुतीतील घटक पक्षांमध्येच मतभेद उघड झाले आहेत. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात ‘चैत्यभूमी’ नामकरणाचा विषय कोणते राजकीय वळण घेतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


