पुणे प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. पवार यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळासह त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Baba has been admitted to Ruby Hall Clinic, Pune, following a bout of cough. He is undergoing medical tests, and all his health parameters are stable.
Thank you all for your concern and good wishes.
— Supriya Sule (@supriya_sule) November 2, 2026
दुष्काळग्रस्त भागांच्या दौऱ्यानंतर प्रकृती बिघडली
शरद पवार यांनी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांचे नुकसान आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकटांची त्यांनी माहिती घेतली होती. शेतकऱ्यांच्या समस्या सरकारदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.
या दौऱ्यानंतर त्यांना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवाळीनंतर करमाळ्यात करणार होते दुष्काळाची पाहणी
दरम्यान, दिवाळीनंतर शरद पवार करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार होते. मात्र, बारामती आणि भिगवण परिसरात रविवारी रात्री झालेल्या मोठ्या पावसामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी दिली होती.
शरद पवार यांची भेट घेऊनच आपण करमाळ्याला गेलो होतो. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू होती. दिवाळीनंतर ते निश्चितपणे करमाळा तालुक्याचा दौरा करतील, असेही नारायण पाटील यांनी स्पष्ट केले होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अलीकडेच दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणाऱ्या शरद पवार यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.


