
पुणे प्रतिनिधी
पुण्यात बिबवेवाडीत गाड्या फोडून दहशत माजविण्याचे प्रकरण ताजे असतानाच आज उप मुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार यांनी कोयता गैंगसह संबंधित गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलिसांना मोकळीक असल्याचे जाहीरपणे सांगितले.
आज पिंपरी चिंचवड परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ झाला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आपल्या भाषणात अजित दादांनी पुण्यातील गुन्हेगारीचा समाचार घेतला. बिबवेवाडी येथील गाड्या फोडण्याच्या प्रकरणाचा उल्लेख करून त्यांनी व्यासपीठावरूनच कोयता गैंग आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पूर्ण मुभा असल्याचे सांगितले. गरज पडल्यास कोयता गैंगलं मकोका लावा अशा सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या.
उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार यांच्या या जाहीर निर्देशानंतर पोलीस आणखी कडक कारवाई करण्याची शक्यता असून पुणेकरांना कोयता गैंग सारख्या दह्शत माजविणाऱ्या गुंडाकडून दिलासा मिळणार आहे.
दरम्यान दोन दिवसापूर्वी पुणे शहरातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, आई माता मंदिर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची हातात धारदार शस्त्र घेऊन तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील बिबवेवाडी परिसरातील अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री एका टोळक्याने दांडक्या ने रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी, टेम्पो आणि रिक्षांची तोडफोड केली होती.