
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीतील साईबाबा संस्थान एका घटनेमुळे सध्या चर्चेत आहे. शिर्डीतल्या साईबाबा संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार लुटीच्या उद्देशाने बाईकवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.
हल्ल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी शिर्डीतलं मोफत जेवण बंद करण्याचा सल्ला दिला होता. शिर्डीत मोफत जेवण मिळत असल्याने राज्यातले सगळे भिकारी शिर्डीमध्ये गोळा झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं. मोफत जेवण बंद करण्याची मागणी सुजय विखेंनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर खूप टीका झाली. मात्र आता शिर्डीमधील साईबाबा संस्थानाने मोफत अन्न प्रसादाविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे.
शिर्डीत मोफत जेवणासाठी घ्यावं लागणार कूपन
शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आता टोकन पद्धतीने मोफत भोजन देण्यात येणार आहे. भाविकांना साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी कूपन दिले जातील. साईबाबांच्या दर्शनासाठीच्या रांगेतील उदी काऊंटरवर हे कूपन दिले जाणार आहेत. सध्या शिर्डीत गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी शिर्डीमध्ये अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन झाल्यावर भाविक साई प्रसादालयात मोफत भोजन घेत होते. दररोज साधारणपणे 50 ते 60 हजार लोक या ठिकाणी रोज जेवतात. मात्र आता या प्रसादालयात जेवायचं असेल तर तुम्हाला कूपन घ्यावं लागणार आहे. उदी काऊंटरव्यतिरिक्त भक्त निवासातही मोफत जेवणासाठीचे कूपन मिळेल. तसेच प्रसादालयात देखील कूपन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे.
साईबाबा संस्थानने पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला आहे. शिर्डीत याआधी मोफत जेवणासाठी थेट प्रवेश दिला जायचा. मात्र आता कूपन असलेल्यांनाच मोफत जेवण दिलं जाणार आहे.