नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्तपासणीला (SIR) विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या आंदोलनाला मंगळवारी नाट्यमय वळण मिळाले. संसद भवन परिसरातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघालेल्या विरोधी पक्षांच्या मोर्चाला पोलिसांनी अडवल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. सुमारे आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर काही वेळाने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “लोकशाहीच्या देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी लोकशाहीचे जे काही उरले आहे, ते कचराकुंडीत ओढले गेले आहे. याचा हिशोब चुकता केला जाईल; एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही,” असा आशय त्यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केला. आंदोलनादरम्यानही त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले होते.
आकाशवाणी भवनात ठिय्या; पोलिसांची मोठी कारवाई
इंडिया आघाडीचे खासदार संसद भवनातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून त्यांचा मार्ग रोखला. राहुल गांधी यांनी बॅरिकेडवर चढून तिरंगा हातात घेतला आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, के. सी. वेणुगोपाल, पवन खेरा, इम्रान प्रतापगढी यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी आकाशवाणी भवनाच्या परिसरात प्रवेश करून तेथे ठिय्या आंदोलन सुरू केले.
या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करायचे असल्याचे सांगितले. विरोधी पक्षांचा आरोप आहे की SIR प्रक्रियेमुळे मतदार याद्यांमधून पात्र मतदारांची नावे वगळली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येत आहे.
राहुल-प्रियंका यांना ताब्यात घेतले
आंदोलन तब्बल आठ तास सुरू राहिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी भवन परिसरातील आंदोलक नेत्यांना हटवण्यास सुरुवात केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, के. सी. वेणुगोपाल, पवन खेरा, अमरिंदर सिंग राजा वडिंग, चरणजीतसिंग चन्नी यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. वृत्तानुसार सुमारे ५० खासदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना किंग्सवे कॅम्प येथील पोलीस सुविधेकडे नेण्यात आले.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या सुप्रिया सुळे यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे नेते मोर्चात सहभागी झाले होते.
भाजपचा काँग्रेसवर पलटवार
दरम्यान, भाजपने या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित करताना निवडणूक आयोगाकडे कोणत्याही पक्षाने औपचारिक भेटीची मागणी केली नसल्याचा दावा केला. विरोधकांकडे बोलण्यासाठी ठोस मुद्दे उरलेले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपकडून राहुल गांधींच्या आंदोलनाला ‘नाट्य’ संबोधत काँग्रेसवर राजकीय आरोप करण्यात आले. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांनीही निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर आरोप करून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून औपचारिक भेटीची विनंती प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाला आता राजकीय संघर्षाचे स्वरूप आले असून, SIR प्रक्रिया, मतदार याद्या आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची ताब्यात घेतल्यानंतर सुटका करण्यात आली असून, या आंदोलनानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे. पुढील काळात निवडणूक आयोगावरील विरोधकांची भूमिका आणि SIR विरोधातील आंदोलन कोणते वळण घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


