सातारा प्रतिनिधी
सातारा : भारतीय नौदलातील शौर्याची परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा देदीप्यमान वारसा यांची सांगड घालत पश्चिम नौदल कमांडच्या (वेस्टर्न नेव्हल कमांड) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्लिट टू फोर्ट’ दुचाकी रॅलीचे शुक्रवारी साताऱ्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. युवक-युवतींनी भारतीय नौदलात अधिकारी व सैनिक म्हणून सहभागी व्हावे आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा जपण्याची प्रेरणा घ्यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

पश्चिम नौदल कमांड, मुंबईच्या या रॅलीत अधिकारी, नौसैनिक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले आहेत. रॅलीचे नेतृत्व कराडचे सुपुत्र कॅप्टन शेखर देशपांडे करत आहेत. सातारा जिल्हा माजी नौसैनिक संघटना आणि सातारा नेव्हल वेटरन्सच्या पदाधिकाऱ्यांनी सैनिक स्कूल येथे रॅलीचे पुष्पगुच्छ आणि कंदी पेढे देऊन जंगी स्वागत केले.
विशेष म्हणजे, पश्चिम नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ॲडमिरल राहुल गोखले यांच्या पत्नी तसेच नौदल प्रमुख ॲडमिरल स्वामीनाथन यांच्या कन्याही या रॅलीत सहभागी झाल्या आहेत. साताऱ्यातील दोन दिवसांच्या मुक्कामात रॅलीतील सदस्य विविध शाळा, ऐतिहासिक किल्ले तसेच कास पठाराला भेट देणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय नौदलाविषयी आकर्षण निर्माण करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाची माहिती देण्यात येणार आहे.
दरम्यान, रॅलीतील सदस्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘जलमंदिर’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीनंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर रॅलीने पुढील प्रवासाला सुरुवात केली.
यावेळी माजी नौसैनिक नगरसेवक शंकर माळवदे, सूर्यकांत पडवळ, अशपाक पटेल, राजू निकम, जीवन शिंगाडे, उमेश साळुंखे, श्रीकांत फाळके, सागर नेवसे, मंदार शेटे तसेच सैनिक स्कूलचे प्राचार्य उपस्थित होते.
पश्चिम नौदल कमांडची महत्त्वाची भूमिका
वेस्टर्न नेव्हल कमांड ही भारतीय नौदलाची प्रमुख ऑपरेशनल कमांड असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीसह अरबी समुद्रातील सागरी सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी या कमांडकडे आहे. नौदलाच्या विविध युद्धनौका, विमानवाहू नौका आणि पाणबुड्यांच्या माध्यमातून देशाच्या सागरी सुरक्षेत या कमांडची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
‘फ्लिट टू फोर्ट’च्या माध्यमातून नौदलाची शौर्यगाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी व दुर्गसंरक्षणाच्या परंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.


