मुंबई प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘गर्जना मोर्चा’तून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल करत ‘भारत देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा नाही’, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. मतदार यादीतील कथित वगळण्याच्या प्रक्रियेवरूनही त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
‘एसआयआर रद्द करा’ची मागणी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या गर्जना मोर्चातून विशेष पुनरिक्षण कार्यक्रम अर्थात एसआयआर रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. राज ठाकरे यांनी मोर्चाला संबोधित करताना निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाच्या रचनेपासून आयुक्तांच्या नियुक्तीपर्यंत अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारवर निशाणा साधला.
‘निवडणूक आयुक्तांची निवडणूक का होत नाही?’
उद्धव ठाकरे म्हणाले, “राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होते, मग निवडणूक आयुक्तांची निवडणूक का होत नाही? त्यांची नेमणूक का केली जाते? पूर्वीच्या निवड समितीत सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते होते. आता त्यातून सरन्यायाधीशांना बाजूला करण्यात आले आहे.”
निवड समितीतील बदलावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “अमित शहांना समितीत घेण्यात आले. राहुल गांधी यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर अमित शहांनी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केली,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
‘हा लढा स्वातंत्र्याचा’
मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले. “जनसागर उसळला आहे. हा लढा जाती-पातीचा किंवा धर्माचा नाही. हा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे,” असे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी ‘मेक इन इंडिया’च्या घोषणेचाही संदर्भ दिला. “मेक इन इंडियाच्या माध्यमातून हुकूमशहा तयार होत असेल, तर त्यांना गाडण्यासाठी आम्ही उभे ठाकलो आहोत. हुकूमशहा तयार होत असतील तर त्यांना गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार कोणाला दिला?’
मतदार यादीतील नावांवरून सुरू असलेल्या वादावर उद्धव ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. देशभरातील कोट्यवधी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील मतदार यादीच्या प्रक्रियेचा उल्लेख केला.
“एसआयआर हा गैरकायदा आहे. नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार ज्ञानेश कुमार यांच्या बापाचा नाही,” असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर त्यांनी आपला रोख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे वळवत, “अमित शहा हे ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून हा अधिकार वापरत आहेत,” असा आरोप केला.
ठाकरे बंधूंसोबत विरोधकांची एकजूट
गर्जना मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह विविध विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदार यादीतील नावांची वगळणी आणि एसआयआरच्या अंमलबजावणीविरोधात विरोधकांनी एकत्रितपणे आवाज उठवला.
दरम्यान, निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेविरोधात देशभरातील विरोधी पक्षांकडूनही टीका होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे गर्जना मोर्चाच्या निमित्ताने मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


