मुंबई प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला. हा मोर्चा म्हणजे ठाकरे बंधूंची “हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न” असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. तसेच महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या आरोपांवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य करणाऱ्या ठाकरे बंधूंना त्यांनी ‘गजनी’ अशी उपमा देत थेट प्रत्युत्तर दिले.
“एवढी हाईप निर्माण करूनही मोर्चाला फारसे लोक उपस्थित नव्हते. हा मोर्चा म्हणजे आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न होता,” असा दावा फडणवीस यांनी केला. ठाकरे बंधूंकडून सातत्याने महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला जात असून, त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटविण्याची मागणी केली जात असल्यावरही फडणवीस यांनी भाष्य केले.
“हे सातत्याने म्हणतात की महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झाली. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना हटवा. एसआयआरमुळे ज्ञानेश कुमार यांना हटवा. मी त्यांना आठवण करून देतो, कारण हे गजनी झाले आहेत,” अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली.
‘2024 ची निवडणूक आणि 2026 मधील एसआयआरचा संबंध काय?’
ज्ञानेश कुमार हे 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झाले, तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झाली. महाराष्ट्रात एसआयआरची प्रक्रिया 2026 मध्ये सुरू आहे. त्यामुळे 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या व्यक्तीचा 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
“महाराष्ट्रातील निवडणुका 2024 मध्ये झाल्या. ज्ञानेश कुमार 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झाले. महाराष्ट्रातील एसआयआर 2026 मध्ये होत आहे. मग 2025 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या व्यक्तीचा 2024 च्या निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो?” असा सवाल त्यांनी केला.
“आपण खोटे बोलत असलो तर ते सत्य वाटेल असे तरी बोलले पाहिजे. मात्र, येथे धडधडीत असत्य बोलले जात आहे. लोकांनी नाकारल्यानंतर येणारी फ्रस्ट्रेशन निवडणूक आयोगावर काढली जात आहे,” अशी टीका फडणवीस यांनी केली.
‘तीनही जागा भाजप जिंकेल’
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून, हे तिन्ही उमेदवार सक्षम असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. “तीनही जागा आम्ही जिंकू. उर्वरित दोन ठिकाणी आमचे मित्रपक्ष लढतील आणि तेही विजयी होतील,” असे त्यांनी सांगितले.
पक्षाकडून ज्याला उमेदवारी देण्यात आली आहे, त्याने निवडणूक लढवावी आणि ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यांनी माघार घ्यावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता जाधव यांना भाजपने उमेदवारी दिल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. “पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता जाधव या अतिशय चांगल्या उमेदवार आहेत. त्यांचा पक्षाला चांगला फायदा होईल आणि मतदार त्यांना निश्चितपणे निवडून देतील,” असे ते म्हणाले.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीचाही त्यांनी उल्लेख केला. शिक्षण क्षेत्रात तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून गावडे यांनी चांगले काम केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. कोहळे हे यापूर्वी आमदार राहिले असून भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे तिन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.


