मुंबई प्रतिनिधी
मुंबई : ‘गर्जना मोर्चा’मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘एसआयआर तात्काळ रद्द करा आणि भविष्यातील निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घ्या’, या दोन प्रमुख मागण्या त्यांनी मोर्चाच्या व्यासपीठावरून मांडल्या. तसेच देशातील सर्व विरोधी पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून या मुद्द्यावर एकत्र येत दिल्लीमध्ये आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज ठाकरे म्हणाले की, २०१७-१८ पासून आपण मतदान यंत्रे आणि मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठवत आहोत. त्यावेळी अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्या वेळी आपल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता आपण त्यावेळी मांडलेल्या प्रश्नांची जाणीव विरोधी पक्षांनाही होत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘भाजप सत्तेत येण्याचा राग नाही’
भाजप पुन्हा सत्तेवर येण्याबाबत आपल्याला वैयक्तिक आक्षेप नाही, असे स्पष्ट करत ठाकरे यांनी सत्तेचा वापर ज्या पद्धतीने केला जात आहे, त्याला आपला विरोध असल्याचे सांगितले. सरकार कोणी स्थापन करावे आणि विरोधी पक्षात कोण असावे, याचा निर्णय निवडणूक आयोगाने नव्हे, तर मतदारांनी घ्यायला हवा, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगासह घटनात्मक संस्थांवर नियंत्रण मिळवून देशातील जमीन, जंगले, विमानतळे आणि बंदरे एका उद्योगपतीच्या हाती सोपवली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. ‘निवडणूक आयोग आपल्या बाजूने आहे आणि त्यामुळे निवडणुका आपल्या इच्छेप्रमाणे जिंकता येतात’, असा जनतेमध्ये समज निर्माण झाल्याने सरकारला जनतेची भीती राहिलेली नाही, असा दावा ठाकरे यांनी केला.
लोकसभा-विधानसभा मतांच्या आकडेवारीवर प्रश्न
२०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील मतांच्या आकडेवारीचा दाखला देत ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारसंख्येत मोठी वाढ कशी झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘अवघ्या सहा महिन्यांत लाखो मतांची वाढ नेमकी कुठून झाली?’ असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील निकालांच्या विश्वासार्हतेबाबतही शंका व्यक्त केली. एवढा मोठा विजय मिळूनही राज्यात अपेक्षित जल्लोष किंवा उत्साह दिसला नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
एसआयआरवरही ठाकरे आक्रमक
एसआयआरच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी निवडणूक यंत्रणेवर निशाणा साधला. त्यांच्या दाव्यानुसार, आधीच्या निवडणुकीत मतांमध्ये मोठी वाढ करून सत्ता मिळवण्यात आली आणि आता एसआयआरच्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जात आहेत.
माजी केंद्रीय गृहसचिव आणि भाजपचे माजी मंत्री आर. के. सिंह यांच्या विधानांचा संदर्भ देत ठाकरे यांनी एसआयआरच्या कायदेशीरतेवरही प्रश्न उपस्थित केला. विशेष परिस्थितीशिवाय अशा प्रकारची प्रक्रिया देशभर किंवा एखाद्या राज्यात एकाच वेळी राबविणे योग्य नसल्याचा दावा त्यांनी केला.
राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या
गर्जना मोर्चातून राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत दोन ठोस मागण्या मांडल्या
१. एसआयआर तात्काळ रद्द करा :
महाराष्ट्रासह देशभर सुरू असलेली एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबवावी.
२. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्या :
ईव्हीएमचा वापर बंद करून भविष्यातील सर्व निवडणुका पारदर्शक पद्धतीने मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात.
लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून दिल्लीला एकत्र जावे आणि या प्रश्नावर एकमुखाने आवाज उठवावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. लोकशाहीची रचना अशाच पद्धतीने कमकुवत होत राहिली, तर भविष्यातील पिढ्यांसमोर देशाची लोकशाही व्यवस्था टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहील, असा इशाराही त्यांनी दिला.


