सुधाकर नाडर | मुंबई
मुंबई: मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर तब्बल तीन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या एका युवा नेत्याला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिवम दुबे उर्फ ‘चोंग्या’ असे या आरोपी युवा नेत्याचे नाव असून, तो महाकाली, एमआयडीसी परिसरात राहतो. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शिवम दुबे याने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर दीर्घकाळ शारीरिक अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, आरोपीने तिच्याकडून लाखाशः रुपये आणि एक महागडी कार सुद्धा लाटल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्यासाठी स्थळ पाहत असल्याची कुणकुण पीडितेला लागली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तातडीने पोलिसांचे दार ठोठावले.
राजकीय वरदहस्त आणि जुना गुन्हेगारी रेकॉर्ड?
पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपी शिवम दुबे हा शिंदे गटातील माजी नगरसेवक कमलेश राय आणि नगरसेवक रितेश राय यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता मानला जातो. विशेष म्हणजे, या युवा नेत्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये त्याच्यावर पोलिसांकडून ‘तडीपारी’ची मोठी कारवाई करण्यात आली होती; मात्र राजकीय दबावाचा वापर करून ही कारवाई रद्द करून घेण्यात आली, असा खळबळजनक दावाही केला जात आहे.
पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल करू नये यासाठी राजकीय दबावाचा वापर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. कमलेश राय आणि रितेश राय यांनी या प्रकरणात पीडितेवर दबाव टाकल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र, सर्व दबावाला न जुमानता तरुणीने हिंमत दाखवत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली.
सध्या आरोपी शिवम दुबे उर्फ चोंग्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस कसून चौकशी करत आहेत. या नराधमाने अशाच प्रकारे इतरही काही तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवले आहे का? यादृष्टीने आता एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.


