मुंबई प्रतिनिधी
आयसीसी पुरुष वनडे विश्वचषक २०२७चे बहुप्रतीक्षित वेळापत्रक अखेर जाहीर झाले असून, क्रिकेटप्रेमींसाठी थरारक सामन्यांची पर्वणी सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये २ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२७ या कालावधीत विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. १४ संघांमध्ये एकूण ५७ सामने खेळवले जाणार असून, १२ ठिकाणी हे सामने होणार आहेत.

केपटाऊन येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. भारताच्या मोहिमेला सुरुवातीलाच मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी केपटाऊनच्या न्यू लँड्स मैदानावर भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. २०२३च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वचषकाच्या मैदानावर आमनेसामने येणार असल्याने या लढतीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलियानंतर लगेच पाकिस्तानशी सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यासाठी चाहत्यांना फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. १० ऑक्टोबर रोजी जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान पेलावे लागेल.
भारताची सुरुवातच दोन मोठ्या सामन्यांनी होणार असल्याने संघाच्या विश्वचषक मोहिमेला पहिल्या आठवड्यातच मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारताच्या गटात कोण?
विश्वचषकाच्या मुख्य फेरीतील १२ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
गट अ : भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि क्वालिफायर अ.
गट ब : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश आणि क्वालिफायर ब.
प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर-७ फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचबरोबर दोन्ही गटांतील चौथ्या क्रमांकाच्या संघांपैकी सरस कामगिरी करणाऱ्या एका संघालाही पुढील फेरीत प्रवेश मिळेल.
२ ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात
विश्वचषकाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी नामिबियाची राजधानी विंडहोक येथे होणाऱ्या सुपर सिरीजने होणार आहे. पात्र ठरलेल्या संघांमधील क्रमवारीतील तीन खालच्या संघांमध्ये ही स्पर्धा होईल. त्यातील अव्वल संघ मुख्य फेरीत प्रवेश करेल.
मुख्य फेरीतील सामने संपल्यानंतर २५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान सुपर-७ फेरी खेळवली जाणार आहे. या फेरीतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील.
अफगाणिस्तान, क्वालिफायर आणि झिम्बाब्वेचे आव्हान
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्ताननंतर भारताचा सामना १४ ऑक्टोबर रोजी त्श्वाने येथे अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी ब्लूमफॉन्टेन येथे भारत क्वालिफायर अ संघाशी भिडेल.
भारताच्या गटातील अखेरचा सामना २४ ऑक्टोबर रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. व्हिक्टोरिया फॉल्सजवळील मोसी-ओआ-टुन्या स्टेडियमवर भारत प्रथमच विश्वचषक सामना खेळणार आहे.
केपटाऊनमध्ये पहिली उपांत्य फेरी; जोहान्सबर्गमध्ये अंतिम सामना
विश्वचषकाची पहिली उपांत्य फेरी १७ नोव्हेंबर रोजी केपटाऊन येथे, तर दुसरी उपांत्य फेरी १८ नोव्हेंबर रोजी त्श्वाने येथे खेळवली जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर होणार आहे.
भारताचे विश्वचषकातील सामने
तारीख सामना ठिकाण
७ ऑक्टोबर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया केपटाऊन
१० ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान जोहान्सबर्ग
१४ ऑक्टोबर भारत विरुद्ध अफगाणिस्तान त्श्वाने
१७ ऑक्टोबर भारत विरुद्ध क्वालिफायर अ ब्लूमफॉन्टेन
२४ ऑक्टोबर झिम्बाब्वे विरुद्ध भारत व्हिक्टोरिया फॉल्स
भारताने २०११ मध्ये मायदेशात वनडे विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारताच्या कामगिरीकडे सातत्याने लक्ष राहिले आहे. आता २०२७च्या विश्वचषकात सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी होणाऱ्या लढतींमुळे भारतीय संघाच्या मोहिमेची उत्सुकता आणखी वाढली आहे.


