जालना प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या नोटिसा, आंदोलकांवरील पोलिस कारवाई आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मराठा आंदोलन पद्धतशीरपणे मोडीत काढायचे आणि मला एकटे पाडायचे, असा डाव आखला जात आहे,’ असा गंभीर आरोप जरांगे यांनी शुक्रवारी अंकुशनगर येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत केला.
ईडी आणि सीबीआयच्या नोटिसांच्या चर्चेवर भूमिका स्पष्ट करताना जरांगे म्हणाले, “ईडी असो वा सीबीआय, आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. ज्याला कर नाही, त्याला डर कशाला?” तीन वर्षांपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनानंतर आता वाहने, ग्रामसभा आणि कार्यकर्त्यांच्या जुन्या नोंदींची चौकशी करून आंदोलनकर्त्यांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘आमचेच काही लोक आंदोलन मोडण्याचा डाव आखत आहेत’
मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत करण्यासाठी बाहेरच्यांपेक्षा आतील काही लोकच षड्यंत्र रचत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. “आंदोलन मोडीत काढायचे आणि मला एकटे पाडायचे, असा कुटील डाव आहे. दुर्दैवाने हे षड्यंत्र करणारे दुसरे-तिसरे कोणी नसून आमचेच काही लोक आहेत,” असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात हजारो कोटींचा भ्रष्टाचार आणि बेहिशेबी संपत्तीचे आरोप असताना तपास यंत्रणांचे लक्ष आंदोलनकर्त्यांकडे का वळले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नाव न घेता शिंदेंवर निशाणा?
सत्ताधारी गटातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना जरांगे यांनी एका मोठ्या नेत्यावरही टीका केली. “आमचा एक मोठा माणूस आहे, त्याला खूप फुगीरपणा आला आहे. तो फुगीरपणा तूच दाबू शकतोस,” असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्याचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, जरांगे यांनी या वेळी कोणाचेही थेट नाव घेतले नाही.
भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत विश्वासाचा अभाव असल्याचा दावाही त्यांनी केला. जळगाव, पुणे, ठाणे आणि परळीतील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी सत्ताधारी गटातील अंतर्गत संघर्षाकडे लक्ष वेधले.
कुणबी प्रमाणपत्रांवरून संताप
कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी मंत्र्यांवरही निशाणा साधला. “पहिले तुम्हीच प्रमाणपत्रे दिली आणि आता राजकीय द्वेषातून ती रद्द करत आहात,” असा आरोप त्यांनी केला.
जात पडताळणीसाठी उच्च न्यायालयात जाण्याऐवजी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सुनावणी घेण्याबाबत उदय सामंत आणि मंगेश चिवटे यांनी दिलेल्या आश्वासनाचीही त्यांनी आठवण करून दिली.
आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवरूनही जरांगे आक्रमक झाले. “मी जेलमध्ये गेलो तरी माघार घेणार नाही. ज्या आंदोलक मुलांवर गुन्हे दाखल झाले आणि जे तुरुंगात गेले, त्यांना संपूर्ण मराठा समाज भाकरी खाऊ घालेल,” असे त्यांनी सांगितले.
‘परळीची टोळी’ या उल्लेखाने राजकीय चर्चेला उधाण
“जेव्हापासून परळीची टोळी सक्रिय झाली आहे, तेव्हापासून राजकारणात आणि आंदोलनात माणुसकी शिल्लक राहिलेली नाही,” असा दावा करत जरांगे यांनी परळीच्या राजकीय हस्तक्षेपावरही टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरक्षणासोबत शेतकऱ्यांसाठीही राज्यव्यापी आंदोलन
आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा जरांगे यांनी दिला. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने आणि दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे सांगत चारा छावण्या, पाण्याचे टँकर आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी त्यांनी केली.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लवकरच राज्यभर मोठे आंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
‘महिनाभर उशीर झाला तरी चालेल, पण…’
मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहताना जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी स्वीकारण्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला. “आरक्षण महिनाभर उशिरा मिळाले तरी चालेल; मात्र हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी घेऊनच राहू. मराठ्यांनी आपली एकजूट फुटू देऊ नये,” असे आवाहन त्यांनी केले.


