गांधीनगर :
फ्लायदुबईच्या विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या असामान्य शौर्याची गुजरात सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी कॅप्टन मच्छार यांना ‘विशिष्ट गुजरात गरिमा सन्मान’ देण्याची घोषणा केली आहे. या प्रतिष्ठेच्या राज्य पुरस्कारासोबत त्यांना २५ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
कॅप्टन स्मित मच्छार यांनी विमानातील गंभीर परिस्थितीत प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर दुबई येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या धाडसाचे आणि मानवतावादी भूमिकेचे देशभरातून कौतुक होत आहे.
कॅप्टन मच्छार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी गुजरातमध्येही प्रार्थना आणि धार्मिक विधी सुरू झाले आहेत. सोमनाथ मंदिरात त्यांच्या प्रकृतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. तसेच वाराणसीतील बाबा विश्वनाथ धामात त्यांच्या लवकर प्रकृतीसुधारण्यासाठी विशेष धार्मिक अनुष्ठान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी रुद्राभिषेकासह महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात येणार आहे.
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याची दखल घेत गुजरात सरकारने जाहीर केलेला हा सन्मान त्यांच्या धाडसी कार्याचा गौरव मानला जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी देशभरातून शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त होत आहेत.


