मुंबई प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणाऱ्या ‘गर्जना’ मोर्चाची दिशा बदलण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मोर्चाचा आधीचा मार्ग बदलण्याची विनंती केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विनंतीला मान देत नवा मार्ग जाहीर केला. त्यामुळे आता भायखळ्याऐवजी मेट्रो सिनेमा येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर त्याचा समारोप होणार आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र,
निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचा 'गर्जना' मोर्चा येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला निघणार आहे.
याबाबत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पण मोर्च्याचा आधीचा मार्ग बदलावा अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली होती.त्या… pic.twitter.com/4TCVhf4JT5
— Raj Thackeray (@RajThackeray) October 2, 2026
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या सहभागातून हा मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चाच्या मार्गात बदल झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी स्वतः दिली. त्यामुळे ४ ऑक्टोबरच्या आंदोलनाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
राज ठाकरे यांनी सांगितले की, “निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचा ‘गर्जना’ मोर्चा ४ ऑक्टोबर २०२६ रोजी निघणार आहे. मोर्चाचा आधीचा मार्ग बदलावा, अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली होती. त्या विनंतीला मान देऊन आता हा मोर्चा ‘मेट्रो सिनेमा’ ते ‘बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय’ असा निघणार आहे.”
तसेच महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक, मोर्चात सहभागी होणारे सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. “बाकी मोर्च्याला भेटूच,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना मोर्चासाठी सज्ज राहण्याचे संकेत दिले.
आधी भायखळ्यापासून होणार होती सुरुवात
२९ सप्टेंबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ४ ऑक्टोबरच्या ‘गर्जना’ मोर्चाची घोषणा केली होती. त्यावेळी भायखळा येथून सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात करून मुंबई महापालिका मुख्यालयासमोर त्याचा समारोप करण्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास मोर्चा महापालिका परिसरात पोहोचणार असून त्यानंतर सभा होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर आता मोर्चाचा प्रारंभबिंदू बदलण्यात आला आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबरला मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा ‘गर्जना’ मोर्चा काढण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचे शक्तिप्रदर्शन
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाची हाक दिली आहे. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष सहभागी होणार असल्याने मुंबईत मोठे राजकीय शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. मोर्चाच्या मार्गात बदल झाल्यानंतर आता या आंदोलनाच्या तयारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


