मुंबई प्रतिनिधी
मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना गुरुवारी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी काही वेळासाठी पोलीस ठाण्यात नेले. २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिपके हे मरीन ड्राईव्ह परिसरात फलक घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.
अभी तो मुंबई में प्रोटेस्ट शुरू भी नहीं किया सीजेपी ने
की उससे पहले ही पुलिस अभिजीत दीपके उनके साथियों को थाने ले गई
मतलब मुंबई पुलिस को लगता है ऊपर से आर्डर आया है
वीडियो की लास्ट में तो सारा खेल उल्टा हो गया 😂 pic.twitter.com/aWsMZBnlv3
— Journalist Fatima ✍️ (@mahsharfatima86) October 1, 2026
दिपके हे काही समर्थकांसह मरीन ड्राईव्हवर आले होते. त्यांच्या हातात फलक होते. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यासह पोलिसांचे पथक त्यांच्याजवळ पोहोचले. त्यानंतर दिपके यांना पोलीस व्हॅनमधून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या घटनेनंतर दिपके यांनी पोलिसांवर आरोप केला. पोलिसांनी चहा पिण्याच्या बहाण्याने आपल्याला पोलीस ठाण्यात आणले, मात्र प्रत्यक्षात चहा दिलाच नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच, आपला वेळ वाया घालवण्यासाठीच आपल्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.
दिपके आणि त्यांच्या टीमने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यामध्ये पोलिसांनी आपल्याला कोणतीही ठोस कारवाई न करता पोलीस ठाण्यात आणल्याचा दावा करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतर आपल्याला सोडण्यात आले असावे, अशी शक्यताही दिपके यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या आरोपांवर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. दिपके यांना कोणत्याही प्रकारे ताब्यात घेण्यात आले नव्हते, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. मरीन ड्राईव्ह परिसरात ते नागरिकांमध्ये फिरत होते आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना प्रश्न विचारत होते. त्यामुळे त्यांच्याकडून काही माहिती घेण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असावे, अशी पोलिसांची भूमिका आहे.
पोलीस ठाण्यात नेल्यानंतर दिपके यांच्यावर कोणतीही चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही. त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले. यावेळी संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने, “तुमचा चहा आमच्याकडे बाकी आहे,” असे उपरोधिकपणे म्हटल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे दिपके यांच्या ‘चहाच्या बहाण्याने पोलीस ठाण्यात नेले’ या दाव्यावरून आता पोलिसांची बाजू आणि दिपके यांचे आरोप यांच्यातील फरक स्पष्ट झाला आहे.


