मुंबई प्रतिनिधी
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या आंदोलनामुळे गणेशभक्तांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या निर्णयाचा मनोज जरांगे पाटील यांनी फेरविचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र, आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर कायम असून, आपण एकटेच मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
गणेशोत्सवाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मराठा आंदोलकांनी मांडलेल्या बहुतांश मागण्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. संविधान आणि कायद्याच्या चौकटीत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यास सरकार तयार आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित किंवा कायद्याच्या कक्षेबाहेरील मागण्यांबाबत संवैधानिक मार्गानेच निर्णय घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
सरकारने चर्चेचे मार्ग बंद केलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या गणेशोत्सव सुरू असून मोठ्या संख्येने नागरिक उत्सवात सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिक आणि गणेशभक्तांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी जरांगे यांना मुंबईतील आंदोलनाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानावर उपोषण करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण सध्या एकटेच मुंबईला जाणार असून समाजबांधवांनी तातडीने मुंबईत येऊ नये, योग्य वेळी आपण त्यांना बोलावू, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पाणी, सलाईन आणि औषधोपचार घेणे बंद ठेवण्याची भूमिकाही त्यांनी कायम ठेवली आहे. तसेच आंदोलनस्थळी पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.

