मुंबई प्रतिनिधी
मुंबई : रॅपिडो बाईक-टॅक्सीच्या मुद्द्यावरून राज्यातील रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण असताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी सरनाईक यांनी रिक्षाचालकांचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
रॅपिडो बाईक-टॅक्सीमुळे हजारो रिक्षाचालकांच्या रोजीरोटीवर परिणाम होण्याची भीती रिक्षाचालकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
संजय राऊत म्हणाले, “राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तो कौतुकास्पद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. हजारो रिक्षाचालक मंत्र्यांकडे जातात, तेव्हा त्यांच्या प्रश्नांचा सहानुभूतीने विचार केला पाहिजे. यापूर्वी रिक्षाचालकांना वाली नव्हता. परिवहन मंत्री म्हणून त्यांनी रिक्षाचालकांचा प्रश्न समजून घेतला.”
“राजकीय भांडणे होत राहतील; मात्र परिवहन मंत्री म्हणून त्यांनी रिक्षाचालकांचे म्हणणे ऐकून घेतले. या रिक्षाचालकांचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आले होते. परिवहन मंत्र्यांनी उत्तम काम केले. त्यांनी संवाद साधला आणि रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. हे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील हजारो रिक्षाचालकांचे प्रतिनिधित्व करत होते,” असेही राऊत यांनी सांगितले.
यावेळी राऊत यांनी यापूर्वी आपण परिवहन मंत्र्यांवर केलेल्या टीकेचाही उल्लेख केला. “हा प्रश्न मांडताना परिवहन मंत्र्यांसाठी कडक शब्द वापरले होते. गरीबांचे म्हणणे ऐकून घेत नाही, रिक्षाचालकांना भेटत नाही, असे म्हटले होते. त्यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर रिक्षाचालकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला,” असे राऊत म्हणाले.
रॅपिडो बाईक-टॅक्सीचा मुद्दा हा हजारो रिक्षाचालकांच्या रोजीरोटीशी संबंधित असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, हे संकट दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री हे राज्याचे आहेत. रिक्षाचालकांनी आपल्या समस्या मांडायच्या तरी कोणाकडे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

