पालघर प्रतिनिधी
पालघर : प्रेमप्रकरणातून झालेल्या कोयत्याच्या प्राणघातक हल्ल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या २४ वर्षीय महसूल अधिकारी स्नेहल सावंत यांचा मंगळवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
स्नेहल सावंत या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. १२ जून २०२६ रोजी सायंकाळी पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात त्यांचा बॉयफ्रेंड अमोल मुळे याने त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात स्नेहल यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर वार झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
हल्ल्यानंतर स्नेहल यांना तातडीने बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे सुमारे तीन आठवडे उपचार घेतल्यानंतर गेल्या महिन्यापासून त्यांच्यावर सातारा येथील पल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, हल्ल्यानंतर पसार झालेल्या अमोल मुळे याचा पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने शोध घेत त्याला अटक केली होती. स्नेहल सावंत यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला आता हत्येचे स्वरूप आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

