सातारा प्रतिनिधी
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. खंबाटकी घाट मार्गावरील खंडाळा येथील जुन्या टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन बोगद्यातील पुणे बाजूकडील एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. तब्बल सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही मार्गिका सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून या भागातील वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली होती. अरुंद मार्गामुळे वाहनांची मोठी गर्दी होत होती. विशेषतः गर्दीच्या वेळेत आणि वीकेंडला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. खंडाळा जुन्या टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा चाचणी घेऊन पुणे बाजूकडील मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
खंबाटकी घाटात दोन बोगदे
सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात दोन नवीन बोगदे तयार करण्यात आले आहेत. यापैकी एका बोगद्यातील उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू असून दुसऱ्या बोगद्यातून वर्षाच्या सुरुवातीपासून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, जुन्या टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने पुढील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवावी लागत होती. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती.
सातारा-पुणे प्रवाशांना दिलासा
जुन्या टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने सात महिन्यांनंतर पुणे बाजूकडील लेन अखेर वाहतुकीसाठी खुली झाली आहे. खंबाटकी घाटातील बोगद्यापासून खंडाळा गावापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याने सातारा-पुणे प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. जुन्या धोकादायक वळणांमुळे होणारा त्रासही कमी होणार असून प्रवास अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.
अर्ध्या तासाचा वेळ वाचणार
नवीन बोगद्यातील सहापदरी रस्त्यामुळे पुणे-सातारा प्रवासातील सुमारे अर्ध्या तासाचा वेळ वाचण्याची शक्यता आहे. खंबाटकी घाटातील धोकादायक वळणे, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. वीकेंड तसेच सणासुदीच्या काळात होणारी वाहतूक कोंडीही कमी होण्याची अपेक्षा आहे.
नवीन बोगद्यात आधुनिक प्रकाशयोजना, सीसीटीव्ही निगराणी, रुंद मार्गिका, परावर्तक चिन्हे तसेच स्पष्टपणे दर्शविण्यात आलेली आपत्कालीन व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जुन्या बोगद्याच्या तुलनेत नवीन बोगदा अधिक रुंद असल्याने वाहनचालकांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

