मुंबई प्रतिनिधी
मुंबई : ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवी रेल्वे स्थानक आणि परिसरातील पादचारी मार्ग, प्रवेश-निर्गमन रस्ते तसेच वाहतूक व्यवस्थेची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी मंगळवारी पाहणी केली. प्रवाशांना सुरक्षित आणि अडथळामुक्त ये-जा करता यावी, यासाठी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासह विविध उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रभादेवी रेल्वे स्थानक, प्रस्तावित पादचारी पूल बाळाशेट मदुरकर मार्गावरील स्थानकाचे प्रवेशद्वार आणि निर्गमन मार्गाची पाहणी करताना वर्मा-लवंगारे यांनी पादचारी पूल, वाहतूक व्यवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यमान पादचारी पुलाच्या प्रस्तावित जिन्याच्या कामाला गती देण्याची सूचना त्यांनी पश्चिम रेल्वेला केली. महापालिकेने ‘पे अॅण्ड यूज’ प्रसाधनगृहासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने प्रस्तावित जिन्याचे काम तातडीने पुढे नेण्याचे निर्देश देण्यात आले.
पादचारी पुलाच्या दक्षिणेकडील प्रवेश-निर्गमन मार्गाचे रुंदीकरण करताना प्रसाधनगृह हटविण्याची आवश्यकता भासल्यास पर्यायी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. प्रस्तावित पादचारी पुलाच्या संरेखनाची व्यवहार्यता तपासून निर्णय घेण्यासोबतच पुलाच्या उतरणीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेने महापालिकेशी समन्वय साधावा, असेही सांगण्यात आले.
रेल्वे स्थानक आणि परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्याचे निर्देश देण्यात आले. स्थानकातून बाहेर पडताना तसेच परिसरात ये-जा करताना प्रवाशांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ही कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले. गर्दी कमी करण्यासाठी शेअर टॅक्सी थांबा आणि टॅक्सी प्रवासी उतरण्याच्या ठिकाणांचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार त्यांचे स्थलांतर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
प्रभादेवी स्थानक परिसराची सर्वंकष स्वच्छता करून आवश्यक ठिकाणी संपर्क व पोहोच रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नमन मीडटाउन आणि इंडिया बुल्स बिझनेस पार्कदरम्यान स्थानकाच्या प्रवेश-निर्गमन मार्गाचे रुंदीकरण करण्याबाबतही चर्चा झाली. रेल्वे स्थानक परिसरात ‘आपला दवाखाना’ उभारण्याच्या प्रस्तावावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
प्रभादेवी स्थानक परिसरात पादचारी, रेल्वे प्रवासी आणि नागरिकांना सुरक्षित, अडथळामुक्त व सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी दिले. पाहणीवेळी जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रलचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह, वरिष्ठ विभागीय अभियंते हिमांशू शर्मा व अभिषेक मित्तल, विभागीय अभियंता सुनील कुमार, एमएमआरडीएचे नरेंद्र साळवी, एमआरआयडीसीएलचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक असित राऊत, वाहतूक पोलिस उपायुक्त धाटे, वरळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगारे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

