
मुरबाड प्रतिनिधी
मुरबाड तालुक्यातील अनुदानीत आदिवासी आश्रमशाळेतील दहावी इयत्तेत शिकणार्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय. घटनेचा तपास टोकावडे पोलीस करत आहेत.
आदिवासी विकास विभागाचे या आदिवासी निवासी शाळेच्या अधीक्षक अणि मुख्याध्यापकांना शाळेच्या आवारातच राहण्याचे निर्देश असताना हा विद्यार्थी शाळेच्या बाहेर कसा गेला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ, निसर्गरम्य,सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत असलेल्या वाल्हिवरे गावात लोकसेवा शिक्षण संस्थेची प्राथमिक व माध्यमिक शासकीय अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सुभाष तुलजी रावते याने दुपारच्या सुमारास शाळेपासून लांब अंतर असणाऱ्या एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबतचा तपास तालुक्यातील टोकावडे पोलीस करत आहेत. मात्र ही शाळा निवासी असतांना या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही या शाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांची असताना हा विद्यार्थी शाळेबाहेर गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित होतोय. सदर विद्यार्थी हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील खोरेपाडा येथील येथील रहाणारा होता. या घटनेवरून आश्रमशाळेतील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
शाळेची पटसंख्या भरण्यासाठी तालुका आणि जिल्ह्याबाहेरील आदिवासी विद्यार्थी हे आणले जातात. मात्र शासकीय अनुदान लाटण्यासाठी या विद्यार्थ्यांच्या आरोग्य, दैनंदिन गरजा, सुरक्षितता याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यासर्व निवासी मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही या शिक्षक व अधिक्षकांवर असते. परंतु शाळेतील विद्यार्थी दिवसभर शाळेबाहेर जाऊन आत्महत्या करतो तरी शाळेतील अधीक्षक अणि मुख्याध्यापक यांना याची कल्पना नव्हती.
अधीक्षक व मुख्याध्यापक हे शाळेत उपस्थित नसल्याची माहिती शाळेतील काही विद्यार्थ्यांना विचारले असता मिळाली आहे. शाळेतील मुले अणि मुली यांना सांभाळण्यासाठी पुरुष अणि स्त्री अधीक्षक असताना या शाळेमधे प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या तर झाली नाही ना ? या विद्यार्थ्यांला शाळेतच मारहाण करून झाडाला लटकून ठेवले तर नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे निर्माण झाले आहेत. आदिवासी विकास विभाग या शाळेतील मुलांना वाऱ्यावर सोडून गेलेल्या मुख्याध्यापक, अधीक्षक आणि वर्गशिक्षक यांच्यावर या मृत्यूला जबाबदार असल्याने कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधव करत आहेत.