रत्नागिरी प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे परतत असताना प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना पाली येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने रत्नागिरी जिल्ह्यासह राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावंत हे बुधवारी सायंकाळी काही कामानिमित्त कोल्हापूर येथे गेले होते. तेथून रत्नागिरीकडे परतत असताना प्रवासातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी वेळ न दवडता त्यांना पाली येथील रुग्णालयात हलवले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
राजेश सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला. पुढे भारतीय जनता पक्षात प्रवेश करत त्यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी विविध स्तरांवर काम केले. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध, शांत आणि संयमी स्वभाव तसेच संघटन कौशल्यामुळे त्यांनी पक्षात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
गेल्या काही काळापासून ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते. मात्र, सामाजिक कार्याशी त्यांचा संपर्क कायम होता. विविध सामाजिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा आणि स्थानिक विकासाच्या कामांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवला. क्रिकेटची विशेष आवड असलेल्या राजेश सावंत यांनी अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये खेळाडू आणि आयोजक म्हणूनही योगदान दिले होते.
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे भाजपसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीच्या राजकीय क्षेत्रातील एक संयमी, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांना नेहमी सोबत घेऊन चालणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
राजेश सावंत यांच्या पार्थिवावर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

