मुंबई प्रतिनिधी
लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी पश्चिम रेल्वेने मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होत असून, दरवर्षीप्रमाणे मुंबई, गुजरात आणि राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ‘ट्रेन ऑन डिमांड (TOD) – एक्स्ट्रा रश’ योजनेअंतर्गत ८ जोड्या (१६ गाड्या) आणि एकूण २१ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या विशेष गाड्या सप्टेंबर महिन्यात धावणार असून, मुंबई, गुजरात, कोकण आणि कर्नाटक या भागांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर तिकीटांसाठी मोठी चढाओढ होत असते. अनेक विशेष गाड्या सोडूनही प्रवाशांची गैरसोय होत असल्याने यंदाही अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, बांद्रा टर्मिनस-रत्नागिरी ही विशेष गाडी अनारक्षित (Unreserved) स्वरूपात धावणार असल्याने तातडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मोठा लाभ मिळणार आहे. उर्वरित सर्व विशेष गाड्या विशेष भाड्याने चालविण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक
०९०१३ / ०९०१४ – मुंबई सेंट्रल – ठोकूर (साप्ताहिक) : १ फेरी
०९०१९ / ०९०२० – मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड (आठवड्यातून चार दिवस) : ८ फेऱ्या
०९०३५ / ०९०३६ – बांद्रा टर्मिनस – रत्नागिरी (साप्ताहिक, अनारक्षित) : २ फेऱ्या
०९११४ / ०९११३ – वडोदरा – रत्नागिरी (साप्ताहिक) : १ फेरी
०९११० / ०९१०९ – विश्वामित्री – रत्नागिरी (द्विसाप्ताहिक) : ४ फेऱ्या
०९१२४ / ०९१२३ – विश्वामित्री – रत्नागिरी (साप्ताहिक) : २ फेऱ्या
०९०२२ / ०९०२१ – उदना – रत्नागिरी (साप्ताहिक) : २ फेऱ्या
०९०३० / ०९०२९ – वलसाड – रत्नागिरी (साप्ताहिक) : १ फेरी
आरक्षणाची सुविधा उपलब्ध
या विशेष गाड्यांची संपूर्ण माहिती NTES आणि ICMS प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच IRCTC संकेतस्थळ आणि सर्व रेल्वे आरक्षण केंद्रांवर या गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर माहिती फलक, ध्वनिक्षेपकावरील उद्घोषणा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही विशेष गाड्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
वेळेत आरक्षण करण्याचे रेल्वेचे आवाहन
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तिकिटांसाठी मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून शक्य तितक्या लवकर आरक्षण करून घ्यावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात अतिरिक्त विशेष गाड्यांमुळे मुंबईसह गुजरातमधील हजारो चाकरमान्यांचा कोकणातील गावी जाण्याचा प्रवास अधिक सुकर होणार असून, रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.

