भिवंडी : प्रतिनिधी
भिवंडी शहरातील भंडारी कम्पाउंड परिसरात शुक्रवारी पहाटे चार मजली निवासी इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), टीडीआरएफ (TDRF), अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
घटनास्थळी ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू असून, शोधमोहीम जसजशी पुढे सरकत आहे तसतसा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली एका लहान मुलासह आणखी काही जण अडकल्याची माहिती समोर आली असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथके अत्यंत सावधगिरीने काम करत आहेत. आतापर्यंत तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे.
बचाव पथकांच्या माहितीनुसार, संपूर्ण ढिगारा हटविल्यानंतरच दुर्घटनेतील जीवितहानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण कायम असून, नागरिक आणि नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत ‘समीन’ नावाचा तरुण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. समीन हा दुर्घटनाग्रस्त इमारतीत राहत नव्हता. तो जवळील सलूनमध्ये काम करत होता. काही पैसे ठेवण्यासाठी तो संबंधित इमारतीत गेला असताना अचानक इमारत कोसळली आणि तो ढिगाऱ्याखाली अडकल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
“तो नेमका कुठे आहे, त्याची प्रकृती कशी आहे, याची माहिती आम्हाला द्या,” अशी आर्त विनंती त्याच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले असून, बचावकार्य पूर्ण होईपर्यंत परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

