सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्रात कुणबी विरुद्ध मराठा, आदिवासी विरुद्ध धनगर असा सामाजिक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता अनुसूचित जातींमध्येही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अनुसूचित जातीतील समाजघटकांमध्ये सरकारला वाद निर्माण करू देणार नाही. सरकारचे हे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोलापुरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी सोलापुरात आले असता आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपवर्गीकरणाला विरोध करण्यामागील भूमिका स्पष्ट करत सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाविरोधात राज्यभर जनआंदोलन उभारले जात असल्याचे सांगत आंबेडकर म्हणाले की, यापूर्वी परभणी, पिंपरी-चिंचवड, लातूर आणि मुंबईसह विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. आता सोलापुरातही मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र आले आहेत. अनुसूचित जातीतील सर्व समाजघटकांनी एकजुटीने या प्रश्नाचा सामना करण्याची गरज आहे.
‘सरकार जबरदस्तीने उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न करत आहे’
अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा हा केवळ एका समाजाचा प्रश्न नसून, तो संपूर्ण अनुसूचित जातीच्या आरक्षणाशी संबंधित आहे. संबंधित न्यायालयीन निकालाचा दाखला देत त्यांनी अनुसूचित जातीचा समाज एकसंध असल्याची भूमिका मांडली. असे असताना सरकारकडून जबरदस्तीने उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकार आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हा अजेंडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात आहे. सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये. तसेच बदर समिती रद्द करावी आणि उपवर्गीकरणाचा निर्णयही मागे घ्यावा, अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली.
‘अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा डाव हाणून पाडू’
महाराष्ट्रात सध्या साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य असल्याची टीका करत आंबेडकर यांनी काही राजकीय शक्तींवर निशाणा साधला. मनुवादी विचारसरणीच्या हाताला लागलेली काही मंडळी दोन जातींमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनुसूचित जातीतील समाजघटकांमध्ये फूट पाडून त्यांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अनुसूचित जातीतील सर्व समाज एकत्र आले आहेत. त्यामुळे हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
‘आमच्यासोबत मातंग, खाटीक समाजाचे लोकही’
अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांचा उपवर्गीकरणाला विरोध असल्याचा दावा करत आनंदराज आंबेडकर म्हणाले की, आमच्यासोबत मातंग, खाटीक आणि इतर समाजातील लोकही आहेत. संविधानाने अनुसूचित जातींसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यामुळे सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करू नये.
कोणतीही राजकीय युती ही निवडणुकीपुरती असते. आम्ही सत्तेत असतो, तर आज आमदार-खासदार असतो, अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी पसरवू नयेत. राजकीय समीकरणे आणि सामाजिक चळवळी यांची गल्लत करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आठवलेंवरही निशाणा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही आनंदराज आंबेडकर यांनी टीका केली. काही मोजक्या लोकांना आम्ही आमच्यापासून दूर ठेवले आहे. रामदास आठवले यांचा या आंदोलनाशी संबंध नाही. त्यांची समाजाशी नाळ तुटलेली आहे, अशी टीका त्यांनी केली.
रामदास आठवले उपवर्गीकरणाला समर्थन देतात, तर त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्याच्या विरोधात भूमिका घेतात. अशा परस्परविरोधी भूमिकांमुळे कार्यकर्त्यांची गोची होत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले.
‘रस्त्यावर उतरून आणि न्यायालयीन लढाईही लढू’
कर्नाटकातही अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा प्रयत्न झाला आहे. मात्र, त्याला न्यायालयीन स्थगिती मिळाली आहे. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे उपवर्गीकरणाचा निर्णय लागू करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि त्याचवेळी न्यायालयीन लढाईही लढू, असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
बाळासाहेब आंबेडकर हे उपवर्गीकरणाच्या विरोधात भूमिका का घेत नाहीत, हा प्रश्न त्यांना विचारा. भीमराव आंबेडकर आणि मी या मुद्द्यावर भूमिका घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून’
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी भाष्य केले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा देशातील प्रमुख आयकॉन म्हणून पुढे आले आहेत. हे काही मनुवादी शक्तींना सहन होत नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील आरक्षण संपवण्याची मागणी पुढे केली जात आहे. सोशल मीडियावरून खोटी अकाउंट तयार करून आरक्षणाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आरक्षणाचे लाभार्थीच या प्रचाराला योग्य उत्तर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘जनता सर्वश्रेष्ठ; आंदोलनातून ताकद दाखवून दिली’
जे जे लोक जनतेला त्रास देतील, त्यांना बाजूला केले पाहिजे. देशातील कोणतीही यंत्रणा सर्वश्रेष्ठ नाही. जनता सर्वश्रेष्ठ आहे, हे जनतेने विविध आंदोलनांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि जनतेच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या शक्तींविरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील, असे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता असताना आनंदराज आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात आंदोलनाची धार आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांना एकत्र आणून उपवर्गीकरणाविरोधात व्यापक आंदोलन उभारण्याची तयारी रिपब्लिकन सेनेकडून सुरू असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.


