मुंबई, प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे येथील प्रसिद्ध रंगशारदा हॉटेल प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत सुमारे ३३२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात प्रभुदास वीरचंद लोटिया यांच्यावर कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगचे आरोप असून, तपासात एकूण ५१२ कोटी रुपयांच्या कथित ‘प्रोसीड्स ऑफ क्राईम’चा माग काढण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मराठी नाट्य, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हाडाने रंगशारदा प्रतिष्ठान ट्रस्टला सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध करून दिला होता. मात्र, या जमिनीचा वापर मूळ उद्देशाऐवजी व्यावसायिक कारणांसाठी करण्यात आला आणि भूखंड वाटपाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.
तपासात असेही समोर आल्याचा दावा ईडीने केला आहे की, रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडने नियमानुसार नाट्यगृह व कलाकारांच्या निवासासाठीची जागा ट्रस्टकडे हस्तांतरित केली नाही. त्याऐवजी, आवश्यक कायदेशीर परवानग्यांशिवाय त्या जागेवर हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, बार, बँक्वेट हॉल आणि इतर व्यावसायिक आस्थापने सुरू करण्यात आली.
ईडीच्या आरोपानुसार, प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी ट्रस्टच्या जमिनीवरील व्यावसायिक जागांची अनधिकृत विक्री करून त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर प्रभादेवी येथे दुसरी मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला. या व्यवहारातून निर्माण झालेल्या कथित गैरव्यवहाराची रक्कम आतापर्यंतच्या तपासात सुमारे ५१२ कोटी रुपये असल्याचा दावा ईडीने केला आहे.
या प्रकरणातील तपास सुरू असून, पुढील काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


