मुंबई प्रतिनिधी
पत्रकारांशी झालेल्या वादानंतर टीकेचे धनी ठरलेले शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी अखेर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. वादाच्या वेळी आपल्याकडून अनवधानाने अपशब्दांचा वापर झाल्याचे मान्य करत त्यांनी संपूर्ण पत्रकार बांधवांची माफी मागितली. त्याचबरोबर, आपल्या राजकीय भूमिकेवर टीका करण्यास हरकत नसली तरी कुटुंबीयांना आणि विशेषतः दिवंगत वडिलांना राजकीय वादात ओढू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.
दरम्यान, पत्रकारांशी झालेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ त्यांच्या नियोजित पत्रकार परिषदेला अनेक पत्रकारांनी बहिष्कार घातला. त्यानंतर संजय दिना पाटील यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करत घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला.
“मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सातत्याने माझ्यावर वैयक्तिक टीका आणि अपमान होत आहे. आज सकाळी पत्रकार मित्र आले असता मी त्यांना हात जोडून या विषयावर अधिक काही विचारू नये, अशी विनंती केली होती. मात्र वारंवार तोच प्रश्न विचारला गेल्याने वातावरण तापले आणि त्या गोंधळात माझ्याकडून अपशब्द निघाले. त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधू-भगिनींची मनापासून माफी मागतो,” असे त्यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले.
संजय दिना पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांचा उल्लेख करत, “माझ्या राजकीय निर्णयांवर किंवा भूमिकेवर कोणीही टीका करावी, त्यास माझी हरकत नाही. मात्र पत्नी, मुलगी, आई तसेच दिवंगत वडिलांविषयी खोट्या गोष्टी पसरवणे किंवा त्यांचा राजकीय संदर्भात उल्लेख करणे योग्य नाही. कृपया माझ्या कुटुंबाला या वादापासून दूर ठेवावे,” असे आवाहन केले.
व्हिडीओ संदेशात त्यांनी पुन्हा एकदा घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत, “जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये घडला, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून झालेली चूक मान्य असून, भविष्यात असा प्रकार घडू नये याची काळजी घेईन,” असेही नमूद केले.
या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात तसेच पत्रकार संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. संजय दिना पाटील यांच्या माफीनाम्यानंतर हा वाद कितपत शमतो आणि पत्रकार संघटनांची पुढील भूमिका काय राहते, याकडे आता लक्ष लागले आहे.


