मुंबई प्रतिनिधी
मुंबई : नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवाशाची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपीला अवघ्या २४ तासांत लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. रोशन सुवर्णा (३०) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा मीरारोड परिसरातील रहिवासी आहे. कर्नाटकातील मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी पनवेलमध्ये सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.
या हत्येचा तपास करण्यासाठी पश्चिम रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती. तब्बल २५ पोलिस अधिकारी, ७० हून अधिक कर्मचारी आणि विविध रेल्वे पोलिस ठाण्यांतील पथकांचा समावेश असलेल्या जवळपास १०० पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
२३ जून रोजी लोकलमधील हत्येनंतर रोशन सुवर्णा बोरीवली स्थानकावर उतरून पसार झाला होता. बुधवारी पहाटे ५ वाजता बोरीवली जीआरपीमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाला वेग देण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एम. खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देत आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान बोरीवली, अंधेरी, मीरारोड, नालासोपारा आणि परिसरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून आरोपीची ओळख पटली. त्यानंतर मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे रोशन पनवेल परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली.
ना भीती… ना पश्चात्ताप!
हत्येनंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासात अत्यंत महत्त्वाचे ठरले. फुटेजमध्ये आरोपी पावसात निवांतपणे स्थानकाबाहेर चालत जाताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर भीती, घबराट किंवा पळून जाण्याची घाई दिसत नसल्याने तपास अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
हत्येनंतर थेट घरी जाऊन केला आराम
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर रोशन बोरीवली स्थानकाबाहेर आला आणि रिक्षाने थेट घरी गेला. घरी जेवण करून त्याने आराम केल्याचेही तपासात समोर आले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घराबाहेर पडला आणि पनवेलला पोहोचला. तेथून मूळ गावी कर्नाटकला पळून जाण्याची तयारी त्याने सुरू केली होती. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्याला गजाआड केले.
बॅगेतील चाकूचे गूढ अद्याप कायम
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोपीकडे सापडलेला चाकू. बारकोड लावण्याचे काम करणाऱ्या रोशनच्या बॅगेत चाकू का होता, याचे समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही. “मी नेहमी चाकू बाळगतो,” एवढेच उत्तर तो देत असल्याची माहिती आहे. मात्र, हा चाकू नेमका कोणत्या कारणासाठी वापरला जात होता, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
सहा महिन्यांत दुसरी धक्कादायक हत्या
लोकलमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याआधी २४ जानेवारी २०२६ रोजी मालाड रेल्वे स्थानकावरही अशाच प्रकारची घटना घडली होती. किरकोळ वादातून विलेपार्ले येथील ३३ वर्षीय प्राध्यापक आलोक कुमार सिंग यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात बोरीवली जीआरपीने ओंकार शिंदे याला काही तासांत अटक केली होती.
धावत्या ट्रेनमधील गोळीबारानेही हादरला होता देश
३१ जुलै २०२३ रोजी पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ जवान चेतन सिंग चौधरी याने धावत्या ट्रेनमध्ये केलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेत तीन प्रवासी आणि एका आरपीएफ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.
लोकलमधील सलग घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत असून, रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.


