मुंबई प्रतिनिधी
उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा दिला. मात्र या पावसाने मुंबईच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या दादर स्थानकातील सुविधांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा उघड केली. दादर स्थानकाच्या पश्चिम रेल्वे बाजूच्या फलाट क्रमांक १ वरील छत गळू लागल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढताच फलाट क्रमांक १ वरील उपहारगृहाजवळ आणि स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपू लागले. छतावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे फलाटावर पाणी साचले आणि प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेक प्रवाशांना पावसापासून बचाव करण्यासाठी जागा बदलावी लागली, तर काहींना ओल्या जागेतून मार्ग काढत रेल्वे गाठावी लागली.
दादर स्थानक हे पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईला जोडणारे अत्यंत वर्दळीचे स्थानक मानले जाते. दररोज लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. अशा महत्त्वाच्या स्थानकावर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच छत गळत असल्याचे चित्र पाहून प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.
यावेळी अनेक संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्थानकांची दुरुस्ती आणि देखभाल केल्याचा दावा रेल्वेकडून केला जातो. मात्र पहिल्याच जोरदार पावसात छत गळत असेल, तर या दुरुस्तीचे नेमके काय झाले?” असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून विविध कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीही गळकी छते, पाणी साचणे आणि मूलभूत सुविधांचा अभाव या समस्या कायम असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने दादर स्थानकातील गळतीची दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, आगामी दिवसांत आणखी पाऊस झाल्यास दादर स्थानकावरील ही समस्या अधिक गंभीर होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


