मुंबई प्रतिनिधी
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चांना वेग आला असून, साताऱ्यात बुधवारी शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध पदाधिकारी यांच्या भावना आणि मतांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत व्यक्त झालेल्या सर्व प्रतिक्रिया आणि सूचनांचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
महायुतीतील जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. सातारा-सांगली मतदारसंघाची जागा अखेर भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेल्याची चर्चा असली तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अद्याप काही शंका आणि संभ्रम कायम असल्याचे बैठकीतून समोर आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला होता.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले, “सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत उपस्थित सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. काल या जागेबाबतचा तिढा सुटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आमच्यापर्यंत अधिकृत स्वरूपात कोणताही निर्णय आलेला नव्हता. त्यामुळे अनेक सदस्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. बैठकीत व्यक्त झालेल्या सर्व भावना आणि मतांचा अहवाल आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवत आहोत. त्यानंतर ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.”
मतदानापूर्वी अंतिम भूमिका स्पष्ट होणार
विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील अंतिम भूमिका मतदानापूर्वी स्पष्ट केली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. बैठकीनंतर त्यांनी दूरध्वनीद्वारे एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून साताऱ्यातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देसाई यांच्या म्हणण्यानुसार, सातारा-सांगलीची जागा महायुतीत भाजपला देण्यात आली आहे. त्यामुळे ही जागा पूर्ण ताकदीने जिंकण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
“एकही मत इकडे-तिकडे जाता कामा नये. साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही सर्व सदस्यांच्या शंकांचे निरसन करा. कोणत्याही प्रकारचा किंतू-परंतु मनात न ठेवता सर्वांनी महायुती धर्माचे पालन करावे आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे निर्देश शिंदे यांनी दिल्याचे देसाई यांनी सांगितले.
‘शिवसेनेत कोणतीही फूट नाही’
विरोधकांकडून महायुतीतील मतभेदांबाबत होत असलेल्या चर्चांनाही देसाई यांनी उत्तर दिले. “आमच्या सदस्यांना कुठेही सहलीवर किंवा रिसॉर्टमध्ये पाठविण्यात आलेले नाही. सर्व सदस्य स्वतंत्र असून आजच्या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेत कोणतीही फूट पडलेली नाही. त्यामुळे आमच्या सदस्यांविषयी संशय व्यक्त करण्याचे कारण नाही,” असे ते म्हणाले.
भाजप बहुमताच्या जवळ असून महायुतीतील सर्व घटक पक्षांनी परस्पर समन्वयाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. “महायुतीचा नियम काटेकोरपणे पाळला जाईल. भाजप कुठल्याही प्रकारे अडचणीत नाही,” असा दावाही त्यांनी केला.
आमदार महेश शिंदे यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता, “ते भाजपच्या बैठकीला महायुतीचे घटक म्हणून उपस्थित होते. काही पूर्वनियोजित कामामुळे ते या बैठकीला येऊ शकले नाहीत,” असे स्पष्टीकरण देसाई यांनी दिले.
संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र
यावेळी देसाई यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. “संजय राऊत यांची अवस्था ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ अशी झाली आहे. ते रोज काहीही वक्तव्य करत असतात. त्यांच्या या सातत्याने बदलणाऱ्या भूमिकांमुळे सकाळी त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी धावणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची संख्याही हळूहळू कमी होताना दिसेल,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत समन्वय, स्थानिक पातळीवरील नाराजी आणि घटक पक्षांतील समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडे सोपवत शिवसेनेने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याने या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


