मुंबई, प्रतिनिधी
नोकरीचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय एमबीए विद्यार्थिनीला मुंबईत बोलावून तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. राजकीय ओळखींचा वापर करून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत तरुणीला जाळ्यात ओढण्यात आले. त्यानंतर तिच्यावर कथितपणे लैंगिक अत्याचार करून अश्लील चित्रीकरण करण्यात आले आणि त्या आधारे धमकावत तिचे दीर्घकाळ शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मध्य प्रदेशातील शाजापूर येथील रहिवासी असून ती इंदूर येथे फायनान्स आणि टॅक्सेशन विषयात एमबीएचे शिक्षण घेत आहे. लहान वयात वडिलांचे निधन झाल्याने तिच्या शिक्षणाची जबाबदारी नातेवाईकांनी सांभाळली होती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाबरोबरच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीची ओळख ऑगस्ट २०२३ मध्ये इंदूर येथे मोहसीन अन्सारी नावाच्या व्यक्तीशी झाली.
नोकरीचे आश्वासन आणि मुंबईत बोलावणे
मोहसीन अन्सारी याने प्रभावशाली राजकीय व्यक्तींशी ओळख असल्याचा दावा करत मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणी ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिला मीरा रोड येथील एका पेईंग गेस्ट निवासस्थानी ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर काही दिवसांतच तिची ओळख सूरज प्रताप सिंह देवडा याच्याशी करून देण्यात आली. नोकरीच्या नावाखाली विविध ठिकाणी ने-आण केली जात असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान, एका प्रसंगी तिला बेशुद्धावस्थेत नेण्यात आले आणि शुद्धीवर आल्यानंतर आपण विवस्त्र अवस्थेत असल्याचे तिच्या निदर्शनास आले, असे तक्रारीत म्हटले आहे.
अश्लील चित्रीकरण करून धमक्या
तक्रारीनुसार, सूरज देवडा याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे अश्लील चित्रीकरण केले. हा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव टाकण्यात आला. या भीतीचा फायदा घेत आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, पीडितेकडून विविध कारणे सांगून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करण्यात आली. धमक्या आणि दबावाच्या वातावरणात तिच्याकडून सुमारे १५ लाख रुपये उकळल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मित्रांनाही अत्याचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप
तक्रारीतील माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये एका घटनेनंतर आरोपी सूरज देवडा आपल्या काही मित्रांसह एका हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी पीडित तरुणीही तेथे पोहोचली होती. याच ठिकाणी आरोपीने आपल्या काही सहकाऱ्यांना तिच्याशी जबरदस्ती करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात मुन्ना आणि आशिष चौबे यांच्यासह इतर काही जणांची नावेही समोर आली आहेत.
आठ जणांविरोधात गुन्हा
पीडितेने अखेर धाडस करून दहिसर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सूरज प्रताप सिंह देवडा याच्यासह आठ जणांविरोधात लैंगिक अत्याचार, धमकी, फसवणूक, आर्थिक शोषण आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकरणातील आर्थिक व्यवहार, मोबाईल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुराव्यांचीही तपासणी केली जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे नोकरीच्या आमिषाने तरुण-तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या टोळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


