मुंबई प्रतिनिधी
दादरमधील वीर कोतवाल उद्यानाजवळ सोमवारी घडलेल्या भीषण बेस्ट बस अपघातामागे यांत्रिक बिघाड नसून चालकाची निष्काळजीपणा आणि मानवी चूक कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याचा दावा चालकाने केला असला, तरी ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) तो फेटाळून लावला असून बसची ब्रेक यंत्रणा आणि अन्य महत्त्वाचे घटक सुस्थितीत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बेस्टच्या ताफ्यातील ओलेक्ट्रा कंपनीची विद्युत बस दादर प्लाझा परिसरातील वीर कोतवाल उद्यानाजवळ नियंत्रणाबाहेर गेल्याने मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. अपघातानंतर चालकाने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा दावा केला होता.
मात्र, घटनेनंतर आरटीओच्या तांत्रिक पथकाने अपघातग्रस्त बसची तपासणी केली असता वेगळेच चित्र समोर आले. प्राथमिक अहवालानुसार अपघातामुळे बसच्या आतील विद्युत वायरिंगचे नुकसान झाले होते. त्यामुळे बस प्रत्यक्ष रस्त्यावर चालवून तपासणी करणे शक्य नव्हते. तरीही अधिकाऱ्यांनी उभ्या स्थितीत बसची सखोल पाहणी केली.
तपासणीदरम्यान बसच्या गिअर प्रणाली, हँडब्रेक तसेच ब्रेक यंत्रणेमध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. त्यामुळे अपघातासाठी यांत्रिक बिघाड जबाबदार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या प्राथमिक निष्कर्षानुसार चालकाने घाबरून किंवा परिस्थितीचा चुकीचा अंदाज घेत वाहनातील अॅक्सेलरेटर दाबल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बसचा वेग वाढून अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या गंभीर दुर्घटनेची दखल घेत बेस्ट प्रशासनाने चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. समिती अपघाताच्या सर्व पैलूंची तपासणी करून स्वतंत्र अहवाल सादर करणार आहे. तसेच पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांच्या शिफारशी प्राप्त झाल्यानंतर संबंधित चालकाचा वाहन परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या अपघातानंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्युत बसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आरटीओच्या अहवालामुळे अपघातामागील कारण मानवी चुकीकडे निर्देश करत असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


