प्रतिनिधी मुंबई
राज्यात नैऋत्य मान्सूनच्या आगमनाला वेग आला असून पुढील काही दिवसांत पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, गुरुवार (११ जून) आणि शुक्रवार (१२ जून) या दोन दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गोव्यासह दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार सरींसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यांचाही प्रभाव जाणवू शकतो. उत्तर कोकणातील काही भागांत मात्र उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.
१५ जिल्ह्यांना यलो अलर्ट
संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, बीड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक स्थिती
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल राहणार आहे. त्यामुळे मान्सून मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील उर्वरित भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू तसेच बंगालच्या उपसागरातील काही भाग, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशातील काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे.
मुंबईत हलक्या पावसाची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळू शकतात. शहरातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विभागनिहाय अंदाज
कोकण : तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी, काही भागांत जोरदार पावसाची शक्यता. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि किनारपट्टीवर वेगवान वारे वाहण्याचा अंदाज.
मध्य महाराष्ट्र : काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता.
मराठवाडा : तुरळक भागांत पावसाच्या सरींसह मेघगर्जना आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज.
विदर्भ : अनेक भागांत ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मान्सूनची पुढील वाटचाल वेगाने होत असल्याने शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


