स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील भारत डायमंड बोर्समधून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपये किमतीच्या हिऱ्यांचे पार्सल घेऊन एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा डिलिव्हरी बॉय फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी विश्वासघात व अफरातफरीचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चर्नी रोड येथे राहणारे मितुल पटेल हे हिरे व्यापारी असून त्यांची एस. एम. सिक्युअर लॉजिस्टिक कंपनी मुंबई आणि सुरतदरम्यान हिरे, सोने व दागिन्यांच्या वाहतुकीचे काम करते. कंपनीचे मुख्य कार्यालय ऑपेरा हाऊस येथील पंचरत्न इमारतीत असून बीकेसीतील भारत डायमंड बोर्समध्ये शाखा कार्यालय आहे. दिलीपघर गोस्वामी (वय २४) हा कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत होता.
२० मे रोजी मुंबईहून सुरतला पाठविण्यासाठी ११७ कॅरेट हिऱ्यांचे पार्सल कंपनीकडे आले होते. या हिऱ्यांची किंमत सुमारे ३ कोटी ६० लाख रुपये होती. गोस्वामी याला सायंकाळी पाचच्या सुमारास बीकेसी कार्यालयातून हे पार्सल घेऊन चर्नी रोड येथील मुख्य कार्यालयात पोहोचविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, बराच वेळ उलटल्यानंतरही तो कार्यालयात पोहोचला नाही.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. त्यामुळे संशय निर्माण झाल्यानंतर कंपनीकडून बीकेसी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये गोस्वामी हिऱ्यांचे पार्सल घेऊन कार्यालयातून बाहेर पडताना दिसून आला.
यानंतर मितुल पटेल यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दिलीपघर गोस्वामी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. हिऱ्यांचे पार्सल नेमके कुठे गेले आणि आरोपीने ते कोणाकडे सुपूर्द केले का याचा तपास पोलीस करत आहेत.


