मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांच्या परवडणाऱ्या घराच्या स्वप्नाला पुन्हा एकदा मोठा प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या २,६४० सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी तब्बल ७५,३६६ अर्ज दाखल झाले आहेत. सरासरी विचार करता एका सदनिकेसाठी २८.५४ अर्ज प्राप्त झाले असून म्हाडाच्या घरांविषयी नागरिकांमध्ये असलेला विश्वास आणि मुंबईतील परवडणाऱ्या घरांची वाढती मागणी याचे हे स्पष्ट द्योतक मानले जात आहे.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील उपलब्ध सदनिकांच्या विक्रीसाठी ही प्रक्रिया सुरू केली होती. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट अशा विविध वर्गांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
आचारसंहितेमुळे सोडतीची तारीख अद्याप जाहीर नाही
संगणकीय सोडतीची तयारी पूर्णत्वाकडे जात असली तरी सध्या लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे सोडतीचा दिनांक जाहीर करण्यात आलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी लागू असलेली आचारसंहिता २५ जून २०२६ पर्यंत लागू राहण्याची शक्यता असून त्यानंतर सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढील टप्प्यात प्रारूप आणि अंतिम यादी
अर्जदारांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १० जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ऑनलाईन दावे व हरकती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असेल.
छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
कोणत्या प्रकल्पांमध्ये होती घरे?
मुंबई मंडळाने ३० मार्च २०२६ रोजी जाहीर केलेल्या या सोडतीत कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा आदी भागांचा समावेश होता.
या २,६४० घरांपैकी १४५ घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी, ८५८ अल्प उत्पन्न गटासाठी, ७९८ मध्यम उत्पन्न गटासाठी तर ८३९ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
किमतीत कपात ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
या सोडतीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो कन्नमवार नगर, विक्रोळी येथील सदनिकांच्या किमतीत करण्यात आलेली ७.५ टक्के कपात. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमधील १२२१ सदनिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला. यापैकी काही सदनिका स्वतंत्र संकेत क्रमांकांतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या.
कमी केलेल्या किमती, सुधारित सुविधा, पार्किंगची उपलब्धता, आधुनिक बांधकाम आणि महत्त्वाच्या ठिकाणी असलेले प्रकल्प यामुळे अर्जदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे म्हाडाने नमूद केले आहे.
मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या या सोडतीकडे अनेक कुटुंबांचे लक्ष लागले असून आता सर्वांचे डोळे अधिकृत सोडतीच्या तारखेकडे लागले आहेत.


