मुंबई प्रतिनिधी
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आधी उपरोधिक व्हिडीओ, सिस्टीमवर तिखट भाष्य आणि तरुणांमध्ये झपाट्याने वाढणारी लोकप्रियता यामुळे चर्चेत असलेले दिपके आता थेट जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. “भाजपमध्ये ये, नाहीतर अमेरिकेतही येऊन मारू”, अशा आशयाचे धमकीचे संदेश मिळाल्याचा दावा अभिजित दिपकेंनी केला असून त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा विषय सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), युट्यूब आणि फेसबुकवर या प्लॅटफॉर्मचे लाखो व्ह्यूज होत आहेत. बेरोजगारी, भ्रष्टाचार, राजकीय ढोंग, निवडणूक व्यवस्था आणि सर्वसामान्य तरुणांच्या असंतोषावर भाष्य करणाऱ्या व्हिडीओंमुळे दिपके यांची वेगळी ओळख तयार झाली आहे. अनेक तरुण या मोहिमेला ‘सिस्टीमविरोधातील डिजिटल बंड’ म्हणत आहेत, तर काही जण हे केवळ मनोरंजन आणि सोशल मीडिया स्टंट असल्याचे सांगत आहेत.
अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिजित दिपकेंना “ही चळवळ पुढे जाऊन राजकीय पक्षात रूपांतरित होणार का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी, “नक्कीच होऊ शकतं, पण आत्ता त्याबाबत स्पष्ट सांगणं कठीण आहे,” असे उत्तर दिले होते. यानंतरच त्यांच्या राजकीय भूमिकांबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.
मात्र या सगळ्या घडामोडींमुळे दिपके यांच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. अभिजित यांनी राजकारणात पडू नये, ही चळवळ इथंच थांबवावी, अशी भावना त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. “आज सोशल मीडियावर लोकप्रियता आहे, पण उद्या कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या किंवा अटक झाली तर?” अशी भीती त्यांच्या कुटुंबीयांना वाटत असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडिया प्रसिद्धी आणि वास्तवातील राजकीय संघर्ष यात मोठा फरक असतो, याची जाणीव कुटुंबीयांकडून करून दिली जात असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, अभिजित दिपकेंनी स्वतःच्या एक्स अकाउंटवर काही स्क्रीनशॉट पोस्ट करत धमकी मिळाल्याचा दावा केला आहे. “आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत,” असे कॅप्शन देत त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकाचाही उल्लेख केला. या कथित संदेशामध्ये “तुला पैसे मिळतील, अकाउंट बंद करून टाक”, “सोशल मीडिया बंद नाही केलंस तर अमेरिकेत येऊनही संपवू” अशा प्रकारची भाषा वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोन गट स्पष्टपणे दिसून आले. एका बाजूला दिपकेंना समर्थन देणारे तरुण “मत मांडण्याचा अधिकार दाबला जातोय” असे म्हणत त्यांच्या बाजूने उभे राहिले, तर दुसरीकडे अनेकांनी या धमक्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही वापरकर्त्यांनी “हे एआय एडिटेड असू शकते”, “तुझीच टीम पब्लिसिटीसाठी हे करत आहे”, “सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने तर “या धमक्यांचा कट तूच रचला आहेस” असा थेट आरोपही केला.
सोशल मीडियातील व्हायरल प्रसिद्धी, त्यातून निर्माण होणारा प्रभाव आणि त्यानंतर सुरू होणारे ट्रोलिंग, धमक्या व संशयाचे वातावरण याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत डिजिटल प्लॅटफॉर्मवरून उदयास आलेल्या अनेक सामाजिक आणि राजकीय मोहिमांना अशाच प्रकारच्या वादांचा सामना करावा लागला आहे. लोकप्रियता वाढली की समर्थनाबरोबरच विरोध, ट्रोलिंग आणि वैयक्तिक हल्लेही वाढतात, हे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले आहे.
अभिजित दिपके यांनी या धमक्यांबाबत अधिकृत पोलिस तक्रार केली आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या पोस्टनंतर हा विषय सोशल मीडियावर वेगाने पसरला असून ‘कॉकरोच जनता पार्टी’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. डिजिटल व्यासपीठावर सुरू झालेली ही चळवळ खरोखर राजकीय स्वरूप धारण करणार की केवळ सोशल मीडिया ट्रेंड म्हणूनच मर्यादित राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


