
पुणे प्रतिनिधी
भोर शहरातील शेजारी शेजारी असलेल्या चार घरातून ९ लाख रुपये रोख, १८ तोळे सोने, २ किलो ७०० ग्रॅम चांदी असा सर्व मिळून २६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करुन चोरीला गेल्याने भोर शहरात खळबळ उडाली होती.
१४ जानेवारी रोजी घडलेला हा गुन्हा एका आंतरराज्य घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगाराने केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले. त्याच्याकडून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, २ किलो चांदीची भांडी, रोख रक्कम, कार असा १६ लाख ५८ हजारांचा माल जप्त केला आहे.
लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने (वय ३१, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रात ठिकठिकाणी घरफोडीचे गुन्हे केले असून त्याच्यावर सुमारे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकात चोरी केल्यानंतर त्याने ७ वर्षाची शिक्षा भोगलेली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या तपासाची माहिती दिली. याबाबत माधव दामोदर पुरोहित (वय ६४, रा. श्रीपतीनगर, भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते वन विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. घरात देव करण्यासाठी त्यांनी अडीच किलो चांदी साठवून ठेवली होती. तसेच पत्नी व सुनेचे दागिने होते. ते पुण्यात नातीच्या बोरन्हाणंसाठी २ दिवस आले होते. त्या दरम्यान त्यांच्या घरातून २ लाख रुपये रोख, १४ तोळे सोन्या चांदीचे दागिने असा १५ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. त्यांच्या शेजारी राहणार्या तीन घरांमध्येही घरफोडी झाली होती.
भोर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकाचवेळी चार घरात घरफोडी झाली होती. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष पथकाची स्थापना केली. त्यांनी घटनास्थळाकडे जाणारे येणारे सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक व्यक्ती संशयास्पदरित्या दिसून आली. चोरी होण्यापूर्वी सहा ते सात तास अगोदार ही व्यक्ती श्रीपतीनगर परिसरात येऊन गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यानेच चोरी केल्याची खात्री झाली. या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केल्यावर ती व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन माने (रा. मंगळवेढा) हाच असल्याची खात्री झाली. त्याला पकडण्यासाठी पथक मंगळवेढा येथे गेले. त्याचवेळी २४ जानेवारी रोजी तो शिरवळकडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्याचा पाठलाग करुन पुणे -सातारा रोडवरील ससेवाडी परिसरात ताब्यात घेण्यात आले.
आयुष्यभराची पुंजी व देव करण्यासाठी साठवलेली चांदी चोरीला गेल्याने माधव पुरोहित यांनी अतिशय हळहळ व्यक्त केली होती. हा गुन्हा उघडकीस आल्याचे समजल्यावर श्रीपतीनगरमधील या चारही कुटुंबीयांचे चेहर्यावर आनंद पसरला. भोर शहरातील ग्रामस्थांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, मंगेश भगत, महेश बनकर, मंगेश थिगळे, विजय कांचन, धीरज जाधव, अजित भुजबळ, काशिनाथ राजापूरे, केतन खांडे, अतुल मोरे यांनी केली आहे.
.