मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याआयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी मंगळवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून त्यांनी अधिकृतपणे कारभार हाती घेतला.महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात सायंकाळी ५.१५ वाजता झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात भिडे यांनी पदभार स्वीकारत प्रशासनाची सूत्रे आपल्या हाती घेतली.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे तसेच उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड उपस्थित होते.
आश्विनी भिडे या राज्यातील अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम करताना पायाभूत सुविधा, प्रकल्प व्यवस्थापन आणि शहरी प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका च्या कारभारात नवे निर्णय आणि गती येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे


