बीड प्रतिनिधी
परळी (जि. बीड) येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केल्यानंतर तहसील कार्यालय परिसरात काही नागरिकांनी फटाके फोडून समाधान व्यक्त केले. दीर्घकाळापासून वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या अधिकाऱ्यावर अखेर कारवाई झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) माहितीनुसार, एका तक्रारदाराकडून ‘ऐपत्ती प्रमाणपत्र’ देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंडे यांच्यावर होता. तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे सांगितले जाते. या संदर्भात बीड एसीबीकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार पथकाने तहसील कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराच्या हालचालींवरून संशय आल्याने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली गेली नसली तरी मागणी व तडजोडीचे पुरावे संकलित केल्यानंतर कारवाई करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वारंवार वादाच्या केंद्रस्थानी
मुंडे यांचे नाव यापूर्वीही विविध वादांमध्ये चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांना निवडणूक कामकाजापासून दूर ठेवण्याची मागणी केली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांची बदली करण्याची मागणी वारंवार केली होती. बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांच्या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही परळी तहसील कार्यालयातील व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले होते. वैद्यनाथ मंदिर संस्थानाशी संबंधित जमीन प्रकरणातही त्यांच्यावर दुर्लक्ष केल्याचे आरोप झाले होते.
कारवाईनंतर नागरिकांचा जल्लोष
तहसीलदारांवर कारवाई झाल्याची बातमी समजताच काही नागरिक तहसील परिसरात जमले. ‘ही कारवाई अपेक्षित होती’, ‘योग्यच झाले’ अशा प्रतिक्रिया देत काहींनी फटाके फोडले. वादग्रस्त ठरलेल्या प्रशासनिक कामकाजाबाबत स्थानिक पातळीवर असंतोष असल्याचे या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील तपास सुरू असून विभागाकडून अधिकृत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.


