सातारा प्रतिनिधी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर साताऱ्यात भरलेले ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ऐतिहासिक ठरत असून, या संमेलनाच्या निमित्ताने सातारा जिल्हा पुन्हा एकदा साहित्यिकांच्या कुंभमेळ्याचे केंद्र बनला आहे, असे प्रतिपादन संमेलनाचे स्वागताध्यक्ष व मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले यांनी केले.
ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संमेलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस बँडने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करून मानवंदना दिली.
उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, मंत्री उदय सामंत, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. दुपारी हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वागतपर भाषणात शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावे यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याने याला विशेष महत्त्व आहे. माझे वडील छत्रपती अभयसिंहराजे भोसले ६६ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यानंतर ९९ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होण्याचा योग मला लाभला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करताना ते म्हणाले, “मराठेशाहीचा वारसा, लष्करासाठी योगदान देणारे तरुण आणि समृद्ध साहित्यिक परंपरा ही साताऱ्याची ओळख आहे. भाषेसाठी आंदोलन करणारा मी पहिला लोकप्रतिनिधी ठरलो. सातारा जिल्हा हे सांस्कृतिक केंद्र व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”
मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरेला अधोरेखित करणारे हे संमेलन पुढील काही दिवस विविध साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे.


