सातारा प्रतिनिधी
नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्टची पार्टी सुरू असतानाच साताऱ्यात एक थरारक दुर्घटना घडली. कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या हॉटेलमधून बाहेर पडताच अंधाराचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा तोल गेला आणि तो थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून, मध्यरात्री उशिरा छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने त्याला दरीतून बाहेर काढण्यात आले.
३१ डिसेंबरच्या रात्री क्षेत्रमाहुली येथील आदित्य कांबळे हा तरुण मित्रांसोबत कास पठाराच्या दिशेने असलेल्या एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. पार्टी आटोपल्यानंतर आदित्य हॉटेलच्या बाहेर आला. मात्र, परिसरात पुरेसा प्रकाश नसल्याने आणि रस्त्यालगत असलेल्या दरीचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला व तो थेट दरीत कोसळला.
आदित्य दरीत पडल्याची माहिती मिळताच त्याच्या मित्रांमध्ये एकच गोंधळ उडाला. तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स या आपत्ती व्यवस्थापन व ट्रेकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेला कळवण्यात आले. रात्रीची वेळ, अंधार आणि दरीची खोली यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. मात्र, माहिती मिळताच ट्रेकर्सचे पथक आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
दोरखंड, टॉर्च व अन्य साधनांच्या मदतीने ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या धैर्याने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर जखमी अवस्थेत आदित्य कांबळे आढळून आला. त्याला तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या थरारक बचाव मोहिमेनंतर त्याला सुरक्षितपणे दरीतून वर काढण्यात यश आले. त्यानंतर जखमी आदित्यला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कास पठार परिसर हा निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असला तरी काही ठिकाणी रस्त्यालगत खोल दऱ्या असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी येथे सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. वेळेवर मिळालेली माहिती आणि छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या तत्परतेमुळे तरुणाचे प्राण वाचल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


