सातारा प्रतिनिधी
छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या अनोख्या शैलीमुळे आणि स्पष्ट भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांची चर्चा राजकीय भूमिकेपेक्षा एका भावनिक क्षणामुळे रंगली आहे. कराड नगरपालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) युतीकडून राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर उदयनराजे यांनी मध्यरात्री कराड गाठत आपल्या मित्राची गळाभेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांचे डोळे पाणावल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कराडमधील राजेंद्रसिंह यादव आणि विजय यादव हे बंधू उदयनराजेंचे निकटवर्तीय मित्र म्हणून ओळखले जातात. निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्ष झाले. या निकालानंतर खासदार असलेल्या उदयनराजेंनी थेट कराडमध्ये जाऊन त्यांचे अभिनंदन केले. ही भेट केवळ वैयक्तिक मैत्रीपुरती मर्यादित नसून, तिचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.
विशेष म्हणजे, भाजपचे खासदार असलेल्या उदयनराजेंनी शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्षाची घेतलेली ही गळाभेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सातारा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात या घटनेमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या असून, भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मैत्री, भावना आणि राजकारण यांचा संगम असलेला हा प्रसंग सध्या सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय चर्चेत केंद्रस्थानी आहे.


