मुंबई प्रतिनिधी
वांद्रे (पुर्व.) येथील प्रभाग क्रमांक ९५ मधील उमेदवारीवरून शिवसेना (ठाकरे गट) अंतर्गत निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अधिकृत उमेदवार हरी शास्त्री यांनी संयमित पण ठाम भूमिका मांडली आहे. “पक्षादेश हा सर्वांत महत्त्वाचा असून वायंगणकरांनी नाराजी बाजूला ठेवून एकत्र यावे,” असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट केले की, “ही लढाई कोणत्याही शिवसैनिकाविरोधात नसून भाजप आणि शिंदे गटाविरोधात आहे.”
माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी हरी शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर वायंगणकरांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. या पार्श्वभूमीवर बोलताना हरी शास्त्री म्हणाले, “२०१७ साली मी इच्छुक असताना पक्षाने वायंगणकरांना संधी दिली. त्या वेळी कोणतीही नाराजी न दाखवता मी त्यांच्या प्रचारात सक्रिय होतो आणि त्यांना निवडून आणण्यासाठी काम केले. आजही पक्षाने घेतलेल्या निर्णयाला सर्वांनी मान्य करणे अपेक्षित आहे.”
शास्त्री यांनी पक्षांतर्गत सलोखा राखण्यावर भर दिला. “वायंगणकरांची नाराजी दूर करण्यासाठी मी स्वतः त्यांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरेंसाठी, पक्षासाठी आपल्याला एकत्र काम करायचे आहे. जर ते अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम राहिले, तर पुढील निर्णय पक्ष घेईल,” असे त्यांनी सांगितले.
आपली राजकीय ओळख आणि स्थानिक नाते स्पष्ट करताना शास्त्री म्हणाले, “मी गेली ४२ वर्षे याच परिसरात राहतो. मुंबईचा महापौर मराठी माणूसच व्हावा, ही आमची भूमिका आहे आणि मी स्वतः मराठी आहे. लोकांचे प्रश्न सोडवणे, स्थानिक विकास आणि मराठी माणसाचा हक्क हीच आमची प्राथमिकता आहे.”
विभागीय संघटनाबाबत बोलताना त्यांनी अनिल परब यांचा उल्लेख केला. “अनिल परब हे आमचे विभागप्रमुख आहेत. ते पक्षाचे नुकसान करणार नाहीत, याची मला खात्री आहे. आमची लढाई शिंदे गट आणि भाजपविरोधातच असून मराठी माणसांत फूट पाडण्याचे काम सत्ताधारी करत आहेत,” असा आरोपही शास्त्री यांनी केला.
दरम्यान, वायंगणकर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याची भूमिका जाहीर केल्याने प्रभागातील निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. मात्र, “ही शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढाई राहील; माझी लढाई वायंगणकरांविरोधात नाही,” असे ठामपणे सांगत हरी शास्त्री यांनी समन्वयाचा सूर कायम ठेवला आहे.


